कसारा घाटात दरडी कोसळण्याची भीती

कसारा घाटात दरडी कोसळण्याची भीती

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : कसारा घाटाच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी डोंगर फोडून नवीन रस्ता तयार केला आहे, परंतु प्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याने त्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या लावून उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील कसारा घाटाचे २००२ मध्ये चौपदरीकरण करण्यात आले. या घाटातील काम करताना मोठमोठे डोंगर फोडण्यात आले; मात्र डोंगर फोडल्यानंतर संरक्षक जाळी न लावल्याने दरवर्षी येथे पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. ब्लास्टिंग करून ठेवलेल्या ठिकाणी तडे गेल्याने दरड कधी कोसळेल याची शाश्वती नाही. पावसाचे पाणी या तड्यांमध्ये शिरत असल्याने त्यातील माती निघून गेल्याने दरडी रस्त्यावर पडण्याचे प्रकार घडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. याबाबत दिल्लीतील रोड रिसर्च सेंटरने आठ वर्षांपूर्वी पावसाळ्यात कसारा घाटात दरडी कोसळत असल्याने व दरडी कमकुवत होत असल्याने संपूर्ण दरड परिसरात रोलिंग प्रेसच्या जाळ्या बसवणे गरजेचे आहे, असा अहवाल केंद्र आणि राज्य सरकारकडे सादर केला होता, पण त्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांना आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
दरवर्षी कसारा घाटात दरड कोसळण्याची टांगती तलवार घेऊन प्रवास करण्याची डोकेदुखी कधी संपणार, असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. त्यामुळे दरड पडणाऱ्या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करून नाहक जाणारे बळी वाचवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या घाट रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती सुरू असून दरड पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी फलक लावण्यात आले असल्याचे संबंधित ठेकेदार कंपनीच्या सुपरवायझरने सांगितले.
.....
दुर्घटनांचे सत्र
गेल्या वर्षी सातआठ ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक कोंडी झाल्याने नाहक प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. तसेच दरडी कोसळल्याने अपघात होऊन पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सात वर्षांपूर्वी दरड बसवर कोसळली होती. रेल्वे मार्गावरही दरड कोसळली होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी नवीन घाटरस्ता खचल्याने मुंबईकडे जाणारा रस्ता दोन दिवस बंद करून काम करावे लागल्याने जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. तसेच गेल्या वर्षी जुन्या नाशिककडे जाणारा घाटरस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.
.....
जुन्या कसारा घाटात अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. त्यामुळे येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाटातील धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाने संरक्षक जाळी किंवा अन्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नाहक कोणाचे बळी जाणार नाहीत.
- कोमल गिरी, प्रवासी
....
जुन्या घाटातील खचलेल्या रस्त्याची डागडुजी ठेकेदाराकडून सुरू आहे. तसेच धबधबे असलेल्या व दरड कोसळण्याची शक्यता असण्याच्या ठिकाणी प्रवाशांनी थांबू नये यासाठी फलक लावण्यात आले आहेत. तसेच घाटात रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्यासंदर्भात ठेकेदार कंपनीला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच मोखाडाकडून येणाऱ्या वाहनांनी विरुद्ध बाजूने जाऊ नये यासाठी पर्यायी बोगद्याचा मार्ग सुरू केला असून या मार्गाचा अवलंब करावा.
- संदीप गीते, सह पोलिस निरीक्षक, कसारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com