दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

मालाडमध्ये ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रम
कांदिवली (बातमीदार) ः मालाड पश्चिम येथील ब्राह्मण सभेच्या सभागृहात रविवारी (ता. २८) संध्याकाळी साडेसहा वाजता सतीश भिडे हे आपल्या कलाकार मंडळींसह वीर सावरकर यांच्या झुंजार जीवनावर ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रम सादर करणार आहेत. अखंड भारताचे ध्येय उराशी बाळगून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा देशभक्त मंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालाड ब्राह्मण सभेच्या वतीने करण्यात आले आहे. भारतात व परदेशात मिळून जातीयता-अंधश्रद्धा निर्मूलनाचे ध्येय हा कार्यक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे मानधन घेतले जात नाही. ऐच्छिक आवाहन केल्यावर जो निधी जमतो तो निधी नितीन म्हात्रे यांना सैनिकी शिक्षण मार्गदर्शन शिबिरास देण्यात येतो. सतीश भिडे यांनी भारतात व परदेशात मिळून २९६४ कार्यक्रम मानधन न घेता सादर केले आहेत.

हिंद केसरी चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात
मुंबई : हिंद केसरी मंडळाच्या वतीने आयोजित ‘हिंद केसरी चषक २०२३’ द्वितीय श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेत लोअर परळच्या श्री साई क्रीडा मंडळाने जेतेपद पटकावले. या संघाने वडाळा येथील गावदेवी क्रीडा मंडळावर २१ गुणांनी मात केली. स्पर्धेत विराज खुळे (स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चढाईपटू, श्री साई क्रीडा मंडळ), दीपक म्हात्रे (सर्वोत्कृष्ट पकडपटू, गावदेवी क्रीडा मंडळ), तर सामनावीर म्हणून ओमकार पातेरे (श्री साई क्रीडा मंडळ ) यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेसाठी आमदार सुनील शिंदे, संस्थेचे हितचिंतक दिनेश बोभाटे, सुरेंद्र कामत, निशिकांत शिंदे, कृष्णा मेढेकर, संदीप वलखडे, गणेश हुमरमळेकर, परब बंधू, तसेच सदस्यांनी आर्थिक सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष विवेकानंद रेडकर, कार्यवाह राजेश राणे, महेश निर्मळ, गजानन पवार, राजा केरेकर, हेमंत खांडेकर, पंढरीनाथ परब, अरुण पालव, यादव बंधू, पवार बंधू, नयन वाडेकर व सदस्य आणि खेळाडूंनी मेहनत घेतली.

वांद्रे येथे ‘संगीत संध्याकाळ’
मुंबई ः ‘इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ ॲडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर’ (आयएपीए) या संस्थेतर्फे रंगधाराच्या वतीने ‘एक संगीत संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी ७.१५ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमामागील संकल्पना आणि रचना प्रदीप आणि सीमा पाटोळे यांची असून अलोक काटदरे, सौम्या वर्मा, सागर सावरकर, मोना कामत आणि प्रभुगावकर हे गायक विविध गीते सादर करणार आहेत. त्यांच्या गीतांना संजय मराठे संगीत देणार आहेत.

समॅरिटनसतर्फे ‘स्वयंसेवक प्रशिक्षण’ वर्ग
मुंबई ः समोरासमोर बसून मन मोकळे करण्याच्या समॅरिटनस या संस्थेच्या विशेष सेवेत स्वयंसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी संस्थेतर्फे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांची मनापासून काम करण्याची तयारी आहे, अशांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे. २९ मे ते २ जून या कालावधीत आयोजित हे प्रशिक्षण दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात जस्मिन अपार्टमेंट, दादासाहेब फाळके मार्ग, दादर येथे होणार आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी समॅरिटनस संस्थेच्या samaritansoffline@gmail.com या ई-मेलवर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com