मध्य रेल्वेचे ‘व्हिस्टाडोम’ही प्रवाशांच्या पसंतीस

मध्य रेल्वेचे ‘व्हिस्टाडोम’ही प्रवाशांच्या पसंतीस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे छत आणि रुंद खिडक्या असलेला ‘व्हिस्टाडोम कोच’ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात (नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३) नऊ मेल-एक्स्प्रेसमधील या व्हिस्टाडोम कोचमधून ६६ हजार पर्यटकांनी प्रवास केला, त्यामधून रेल्वेला ८ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

व्हिस्टाडोम कोचमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट आदी वैशिष्ट्यांसह आकर्षक व्ह्युईंग गॅलरी आहे. व्हिस्टाडोम कोचला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन व्हिस्टाडोम कोच ‘डेक्कन क्वीन’ला १५ ऑगस्ट २०२१ पासून आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०२२ पासून जोडण्यात आले. तसेच पुणे-सिकंदराबाद ‘शताब्दी एक्स्प्रेस’लाही एक व्हिस्टाडोम कोच १० ऑगस्ट २०२२ पासून जोडण्यात आला आहे.

जनशताब्दीतून सर्वाधिक महसूल
मध्य रेल्वेवर मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये पहिल्यांदा व्हिस्टाडोम कोच सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीनंतर आतापर्यंत ९ एक्स्प्रेसना हे कोच जोडण्यात आले आहेत. तर जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आलेल्या व्हिस्टाडोम कोचला पर्यटकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला. ८ हजार २५६ प्रवासीसंख्येसह ही एक्स्प्रेस सर्वात पुढे असून १.७१ कोटी महसूल मिळविला आहे. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने १५ हजार ५६४ प्रवासी आणि १.१८ कोटी महसूल मिळविला आहे.

नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ कालावधीत व्हिस्टाडोम कोचची कामगिरी
एक्सप्रेस प्रवासी संख्या उत्पन्न
मुंबई-मडगाव जनशताब्दी ८२५६ १.७१ कोटी
शताब्दी एक्सप्रेस ६३३७ १.३५ कोटी
प्रगती एक्स्प्रेस ८७०० १.३१ कोटी
डेक्कन क्वीन १४,६७२ १.३५ कोटी
डेक्कन एक्स्प्रेस १५,५६४ १.१८ कोटी
तेजस एक्सप्रेस ६०५५ १.५० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com