
गरजवंतांचे कुलाबा वेधशाळेतील सोबती
गरजवंतांचे कुलाबा वेधशाळेतील सोबती
विविध उपक्रमांतून समाजसेवेचे व्रत
नितीन पाटील ः मुंबई
आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, असे वाटणाऱ्यांची संख्या समाजात फार मोठी आहे; मात्र या भावनेने काम करणारे मोजकेच आहेत. आपली नोकरी सांभाळून समाजसेवेचे व्रत घेतलेले कुलाबा वेधशाळेतील काही ‘सोबती’ त्यापैकीच एक आहेत.
समाजातील गरजवंतांसाठी काही काम करावे या हेतूने कुलाबा वेधशाळेतील मित्रांचा समूह प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आला आणि त्यातूनच ‘सोबती सोशल फाऊंडेशन’ संस्था जन्माला आली. गेल्या दशकभराच्या वाटचालीत या ‘सोबती’ने मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील अनेक गरजूंच्या जगण्याला उभारी देण्याचे काम केले आहे. कुलाबा वेधशाळेतील मित्रांचा समूह समाजसेवा करण्यासाठी धडपडत होता. व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक जण काही ना काही करत होता; मात्र त्यांनी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरवले. त्यातूनच ‘सोबती’ फाऊंडेशनचा जन्म झाला. दरवर्षी आपल्या उत्पन्नातील काही वाटा प्रत्येकाने बाजूला काढून एकत्रित करायचा आणि त्यातून सामाजिक कार्य करायचे, असे या मित्रांनी ठरवून काम सुरू केले. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली महेश बुरटे, दीपक झाडराव, अविनाश सर्वेकर, जितेंद्र लोणे, यशवंत साटम, प्रसाद शेजवळकर, राजू कुलणकर, मनोज धोत्रे आदींनी एकत्रित येऊन समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात देण्यास सुरुवात केली.
अशी झाली सुरुवात
‘सोबती’ने सुरुवातीला विविध संस्था, ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत? त्यांना आपण कशी आणि कोणत्या स्वरूपात मदत करू शकतो? हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्यास सुरुवात केली. कार्याची व्याप्ती वाढत गेली, त्यातून ‘सोबती सोशल फाऊंडेशन’ संस्था नोंदणीकृत करण्यात आली. सोबती फाऊंडेशनने महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी म्हणून कामास सुरुवात केली.
दानशूर व गरजवंतांमधील दुवा
समाजात अनेक असे लोक आहेत, की ज्यांना गरजूंना मदत करायची असते, परंतु ती मदत कशी आणि कोणामार्फत करायची हे ठाऊक नसते. अशांना आपल्या कार्यातून विश्वास देत सोबतीने अनेक गरजवंत आणि दानशूरांमधील विश्वासार्ह दुवा बनण्याचे काम केले आहे. ‘सोबती’ कधी स्वतः; तर कधी दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या निधीतून अनेक गरजूंना मदत करत आहे.
संस्थांना दिला मदतीचा हात
श्रीगोंदा येथील भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी काम करणारी संस्था, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी बीड येथील संस्था, विकलांगांसाठी काम करणारी कोल्हापूर येथील संस्था, अंध मुलांसाठी विद्यालय चालवणारी मंडणगड येथील संस्था, नाशिक येथील अनाथ मुलांसाठी काम करणारी संस्था अशा राज्यभरातील अनेक संस्थांना ‘सोबती’ने भक्कम मदतीचा हात देत खऱ्या अर्थाने सामाजिक ऋण फेडण्याचे काम केले आहे.
डे केअर सेंटर
सोबतीने रस्त्यांवरील मुलांच्या संगोपनाचा विषय हाती घेतला. जीवन आनंद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दहिसर येथे रस्त्यावरील मुलांसाठी डे केअर सेंटर सुरू केले. सुमारे ५० मुले गेली तीन वर्षे या सेंटरचा लाभ घेत आहेत. या सेंटरमध्ये येण्यापूर्वी मुलांची स्थिती अतिशय बिकट होती, पण आज तीनचार वर्षांच्या अथक प्रयत्नांनी या मुलांमध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहे.
शिक्षणासाठी मदत
गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्यांची संख्या खूप आहे. अशा होतकरू मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना सोबती संस्थेतर्फे पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. वैद्यकीय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे संस्थेने पालकत्व स्वीकारले आहे. एका विद्यार्थ्याचा वैद्यकीय शिक्षणाचा खर्च साधारणतः चार ते पाच लाख रुपये असून यवतमाळ, अहमदनगर, पुणे, गडचिरोली या जिल्ह्यातील अतिशय गरीब विद्यार्थी या योजनेंतर्गत धुळे, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी संस्थेच्या ‘विद्यार्थी प्रोत्साहन योजनेंतर्गत’ वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
गेली अनेक वर्षे ‘सोबती’ विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. ज्या विश्वासाने लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे, त्या विश्वासाला प्रामाणिक राहून भविष्यात समाजोपयोगी आणखी उपक्रम राबवण्याचे लक्ष्य आहे. लोकांनी सढळहस्ते दिलेले आर्थिक साह्य योग्य ठिकाणी पोहोचेल याची हमी तसेच ‘देणाऱ्याला व घेणाऱ्यालाही’ आनंद मिळेल हाच सोबतीचा ध्यास आणि विश्वास आहे.
- प्रमोद सावंत, अध्यक्ष, सोबती सोशल फाऊंडेशन