
डहाणू, तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के
कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात शनिवारी (ता. २७) पुन्हा भूकंपाचे दोन धक्के बसले आहेत. डहाणू, तलासरी, धुंदलवाडी, चारोटी या परिसरात हे धक्के जाणवले. दहा मिनिटांत दोन हादरे बसले असून या मुळे पुन्हा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी संध्याकाळी ५.१६ मिनिटांनी ३.३ रिश्टर स्केलचा पहिला धक्का; तर ५.२८ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेले भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. डहाणू, धुंडळवाडी, तलासरी, बोर्डी परिसरात हा धक्का जाणवला. या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान, हानी यांची माहिती समोर आली नाही. महसूल अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख केले आहे.
डहाणू, तलासरी परिसरात मागे भूकंपसत्र सुरू होते. त्या वेळी अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. मार्गदर्शन शिबिर आयोजित केली होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी भूकंपांचे हादरे सुरू होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.