कल्याण-डोंबिवलीमध्ये नियम मोडणारे सर्वाधिक रिक्षाचालक

कल्याण-डोंबिवलीमध्ये नियम मोडणारे सर्वाधिक रिक्षाचालक

कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक बेशिस्त रिक्षाचालक
आरटीओच्या कारवाईतून उघड

कल्याण, ता. २९ (बातमीदार) : रिक्षाचालकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, प्रवाशांनी मीटर पद्धतीने प्रवास मागितल्यास त्यांना सेवा देणे रिक्षाचालकाला बंधनकारक आहे. तरी काही रिक्षाचालक ही सेवा देत नसल्याचे समोर आले आहे. त्यात कल्याण, डोंबिवली शहरात सर्वांत जास्त नियम मोडणारे रिक्षाचालकांची संख्या असल्याचे आरटीओच्या कारवाईवरून उघड झाले आहे.
कल्याणसह विविध शहरांत सरकारी यंत्रणा प्रवासी वाहतूक करण्यास अपयशी ठरली आहे. यासाठी राज्य सरकारने बेरोजगारांना रिक्षा चालवण्याकरता विविध योजना आणल्या आहेत. यात अनेकांनी परवाना आणि रिक्षाचे परमिट मिळेपर्यंत मान खाली ठेवून राहिले. मात्र, रस्त्यावर रिक्षा येताच सर्वसामान्य प्रवाशांना ते त्रास देऊ लागले. मुळात रिक्षात बसणाऱ्या प्रवाशाकडून मीटरने रिक्षाभाडे घेतले पाहिजे; मात्र कल्याण, डोंबिवलीमधून रिक्षा प्रवास मीटरने मिळणे दुर्मिळ झाले आहे. गणवेश परिधान न करणे, जादा भाडे घेणे, प्रवासी वर्गाशी हुज्जत घालणे, उद्धट वागणे, प्रवासी भाडे नाकारणे, आदी प्रकार वाढल्याने रिक्षाचालकांविरोधात प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कल्याण आरटीओअंतर्गत कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ आदी शहरांचा समावेश होतो. रिक्षाचालकांविरोधात तक्रारी वाढताच कल्याण आरटीओचे विशेष पथक अशा बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यातून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

तीन वर्षांची आकडेवारी
२०२०-२०२१ मधील कारवाई
या कालावधीत कल्याण आरटीओच्या विशेष पथकाने १ हजार ९७० रिक्षाची तपासणी केली असता त्यात ५८७ रिक्षा दोषी आढळून आल्या आहेत. यात २०१ प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामध्ये जादा भाडे घेणे सात, जादा प्रवासी १४३, भाडे नाकारणे दोन, उद्धट वर्तन पाच आणि इतर ३४२ जणांवर कारवाई केली आहे. ४४ रिक्षाचालकांचे परवाने निलंबन केले असून, ३० जणांचे परवाने निलंबित केले आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांकडून सुमारे ६ लाख ५५ हजार १५० रुपये तडजोड शुल्क वसूल केले असून यात न्यायालयीन दंड सुमारे २१ हजार ७०० रुपये वसूल केला आहे.

२०२१-२०२२ मधील कारवाई
या कालावधीत कल्याण आरटीओच्या विशेष पथकाने ५ हजार ७८० रिक्षाची तपासणी केली असता त्यात ९५७ रिक्षा दोषी आढळून आल्या आहेत. यात ३२९ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये जादा भाडे घेणे ७५, जादा प्रवासी ३४, जलद मीटर १०, भाडे नाकारणे ५१, उद्धट वर्तन २० आणि इतर ६६९ जणांवर कारवाई केली आहे. ४४ रिक्षाचालकांचे परवाने निलंबन केले असून एकाचा परवाना निलंबित केला आहे. बेशिस्त रिक्षाचालकांकडून सुमारे १० लाख ५ हजार १५० रुपये तडजोड शुल्क वसूल केले असून यात न्यायालयीन दंड सुमारे २० हजार ५०० रुपये वसूल केला आहे.

२०२२-२०२३ मधील कारवाई
या कालावधीत कल्याण आरटीओच्या विशेष पथकाने १ हजार ९७० रिक्षाची तपासणी केली असता त्यात २ हजार १७९ रिक्षा दोषी आढळून आल्या आहेत. यात ३४२ प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामध्ये जादा भाडे घेणे १४९, जादा प्रवासी ३७, जलद मीटर पाच, भाडे नाकारणे २६, उद्धट वर्तन ४७ आणि इतर १ हजार ७५४ आदींवर कारवाई करण्यात आली असून, ३१ रिक्षा चालकांचे परवाने निलंबन केले आहेत. ५३ जणांचे लायसन्स निलंबित केले आहे. बेशिस्त रिक्षाचालकांकडून सुमारे २४ लाख ४१ हजार ३५० रुपये तडजोड शुल्क वसूल केले असून, यात न्यायालयीन दंड सुमारे ४० हजार रुपये वसूल केला आहे.


रिक्षाचालकांनी नियमाने प्रवाशांकडून भाडे घ्यावे. बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात आरटीओची कारवाई सुरू आहे. ती आगामी काळातही सुरू राहणार आहे.
- विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण आरटीओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com