पाण्यासाठी रात्री विहिरवर मुक्‍काम

पाण्यासाठी रात्री विहिरवर मुक्‍काम

दीपक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
नेरळ ता. ३० ः कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी आदिवासी वाडी असलेल्या ताडवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सरकारकडून वाडीसाठी टँकरने पुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र तो अत्‍यल्‍प असल्‍याने विहिरीवरच रात्र काढण्याची वेळ महिलांवर आली आहे. अंधारात सर्पदंश, विंचूदंशाच्या भीती असते, मात्र हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घातला जात आहे. दरम्यान सरकारकडून वाडीसाठी पाणी योजना मंजूर झाली आहे, मात्र काम अपूर्ण असल्याने ग्रामस्‍थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.
कर्जत हा आदिवासी बहुल तालुका असून उन्हाळ्यात दुर्गम भागात पाणी टंचाईची तीव्र झळ जाणवतात. पाथरज ग्रामपंचायतीतील ताडवाडीत जवळपास २५० कुटुंबे असून लोकसंख्या ९०० च्या घरात आहे. प्रशासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र तो अपुरा पडत असल्याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी नळपाणी योजना राबविण्याचा निर्णयही झाला असून योजनेचे काम सुरूआहे. मात्र कामातील रखडपट्टीमुळे ग्रामस्‍थ हवालदिल झाले आहेत.
ताडवाडीसाठी टँकरने नियमित पाणी पुरवठा केला जातो. सुमारे १२ हजार लिटर पाणी विहिरीत ओतले जाते. सकाळी ७ ला ओतला जाणारा टँकर काही वेळातच संपून जात असल्‍याने नंबर लावण्यासाठी रात्रीपासूनच महिला विहिरीवर येतात. संध्याकाळी घरातील कामे उरकून अंथरूण व हंडे घेऊन महिला थेट गावातील आडाची विहीर गाठतात. ही विहीरही वाडीपासून थोड्या अंतरावर जंगलात आहे. रात्री तिथे थांबल्यावर किडे , साप, विंचूदंशाची चिंता सतावते. अंधारात सरपडणारे प्राणी दिसला की पळापळ होते, त्‍यात ठेच लागून जखमाही होत असल्‍याचे गावातील महिला सांगतात. पाण्यावरून अनेकदा गावात वादही निर्माण झाले आहेत.
शासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत ताडवाडी, मोरेवाडी येथे पाणी योजना राबवली जात आहे. १ कोटी ३३ लाख ४२ हजार २९६ रुपये मंजूर करत मे २०२२ मध्ये काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले होते. तर मे २०२३ पर्यंत योजना कार्यान्वित होण्याचे संकेत असताना अद्यापही योजनेचे काम अपूर्ण आहे. त्‍यामुळे शासकीय योजनेला पाझर फुटणार केव्हा, तरी असा वाडीतील महिलांकडून विचारण्यात येत आहे.

आम्ही पाण्यासाठी रात्री विहिरीवर झोपतो. टँकर येतो पण पाणी पुरत नाही. मग इथे विहिरीवर नंबर लावतो. पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मध्यंतरी आमदार महेंद्र थोरवे यांना भेटलो होतो. त्यांनी दोन टँकर सुरू करण्यात येतील, असे सांगितले, मात्र प्रत्‍यक्षात एकच टँकर गावात येतो. टँकर विहिरीपर्यंत येऊ शकत नव्हता म्‍हणून गावातील महिलांनी श्रमदान करून रस्‍ताही तयार केला. मात्र तरीही पुरेसे पाणी मिळत नाही.
- शांती केवारी, ग्रामस्‍थ, ताडवाडी

पाणी येणार असे दरवर्षी सांगितले जाते. त्‍यासाठी गावात नळही बसवले, मात्र पाणी आलेच नाही. सरकारच्या भरवशावर किती बसायचे, हा प्रश्न आहे. गावात पाण्याचा त्रास असल्याने कुणी पोरी पण द्यायला तयार होत नाही. आमचा आयुष्य पाणी भरून भरून गेलं.
: मीना आगीवले, महिला ग्रामस्थ

पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावावे लागतात. घरातली कामे उरकून बायका पाण्याची भांडी आणि झोपायला चादर घेऊन येतात. सायंकाळी उशीर झाला तर नंबर लागणार नाही, म्‍हणून अनेकदा जेवतही नाही. इथे पाण्यासाठी भांडणही होतात. पाण्यासाठी महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. किडा (साप) आला की पळावळ होते, पाणी नसेल तर घरातही वाद होतात.
- राही केवारी, महिला ग्रामस्थ

बायका रात्री विहिरीवर नंबर लावायला येतात. विहिरीचा झरा खूप लहान असल्‍याने पाणी साचायला वेळ लागतो. ज्या बाईचा नंबर लागतो, ती पाणी भरते आणि मजुरीला जाते. आणि ज्या बाईचा नंबर लागत नाही, तिची मजुरीही बुडते. आम्हाला कमवायला लागते, कुटुंब सांभाळायचे आहे. पाण्यामुळे खूप हाल सोसावे लागतात.
- बेबी आगीवले, ताडवाडी महिला ग्रामस्थ

ताडवाडी, मोरेवाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्‌भवते. येथे जलजीवन मिशन योजनेचे काम वर्षभरापासून सुरू आहे, मात्र अद्याप पूर्ण न झाल्‍याने महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आला असला तरी ९०० लोकसंख्येने एक टँकर कसा पुरणार, पाऊस पडेपर्यंत ताडवाडीमध्ये पाण्याचा एक टँकर वाढीव मिळावा, अशी मागणी आहे.
- मालू निरगुडे, अध्यक्ष, आदिवासी ठाकूर समाज संघटना, रायगड

ताडवाडी, मोरेवाडी पाणी योजनेचे कामे सुरू आहेत. मेअखेरीस योजना कार्यान्वित होईल, अशी आशा होती, मात्र काही तांत्रिक कारणाने विलंब झाला आहे. सध्या योजनेचे ७० टक्के काम झाले असून ३० टक्के कामासाठी नवीन पाईपची ऑर्डर दिली आहे. टाकीचे काम पूर्ण झाले असून एकूण ४५ हजार लिटर क्षमतेची टाकी असणार आहे. काम लवकरच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून जूनच्या पहिल्या आठवड्यात योजना पूर्ण होईल, यादृष्‍टीने प्रयत्‍न सुरू आहेत.
- सुरेश इंगळे, उपअभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कर्जत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com