रबाळेपासून ऐरोलीपर्यंत कोंडी

रबाळेपासून ऐरोलीपर्यंत कोंडी

नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवरील स्टीलचे बंडल पडल्याने रबाळेपासून ऐरोलीपर्यंत तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनांची झालेली कोंडी फोडण्यात वाहतूक पोलिसांना अपयश आल्याने सार्वजनिक उपक्रमाच्या वाहनांसह खासगी वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचे उन्हाच्या तडाख्याने प्रचंड हाल झाले.
मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्तीमुळे सध्या अवजड वाहनांची वाहतूक रबाळे-ऐरोली-मुलुंड मार्गे ठाण्याच्या दिशेने वळवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर महिनाभरापासून वाहतूक कोंडीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मंगळवारी (ता. ३०) सकाळी ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवरील अवजड स्टीलचे बंडल तुटून रबाळे येथे भररस्त्यात पडले. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेस रबाळे-ऐरोली-मुलुंड या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रबाळे नाक्यापासून ऐरोली ते मुलुंडच्या भांडुप पंपिंग स्टेशनपर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. या कोंडीत शेकडो खासगी वाहने, तसेच बेस्ट, एनएमएमटी व एसटीच्या बस अडकून पडल्या होत्या. मुलुंडपासून ऐरोलीपर्यंत पोहोचण्यासाठी या वाहनांना तब्बल एक ते दीड तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाच्या बसमधून कामानिमित्त जाणाऱ्या हजारो प्रवाशांना कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
----------------------------------------
विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी
या वाहतूक कोंडीत दोन-दोन तास विनाकारण अडकून पडल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. मुलुंड येथून वाशी येथे महाविद्यालयात परीक्षेसाठी जाणारे काही विद्यार्थी या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता आले नाही. त्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
----------------------------------------------
वाहतूक पोलिसांची दमछाक
रबाळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीतील जड वाहने ऐरोली सर्कल येथून पटनीमार्गे वळवून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पडलेले स्टीलचे अवजड बंडल छोट्या क्रेनच्या साहाय्याने उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचे वजन जास्त असल्याने अखेर दुपारी ३ च्या सुमारास हायड्रा क्रेनच्या साहाय्याने हे बंडल हटवण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली होती.
------------------------------------------
ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे स्टीलचे बंडल पडले होते. त्यामुळे सकाळी ८ पासून ऐरोली-मुलुंड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवून पूर्ववत केली आहे.
- गोपाळ कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रबाळे वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com