
वादळी वाऱ्याने घरे, झाडे कोसळली
वज्रेश्वरी, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा सुरू होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागासह पडघा-बोरिवली भागात सर्वाधिक फटका बसला आहे. या भागातील अनेक घरांची छपरे उडून नागरिकांचा संसार उघड्यावर पडला. शिवाय वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उमळून पडली. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार विटांवर प्लास्टिक झाकण्यासाठी वीट उत्पादकांची मोठी धावाधाव झाली होती. अनेक वीटभट्टी मालकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याने शासनाने वीटभट्टी मालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादकांकडून होत आहे. दुसरीकडे वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीला फटका बसून वाहतूक मंदावली आहे.
---------------
रस्त्यांवर पाणी साचले
मार्च महिन्यात तीन वेळा अवकाळी पावसाने याच भागाला जोरदार झोडपले होते. त्या वेळी पावसामुळे पिकांसह फळबागांची नासाडी झाली होती. मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते; तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते. या चिखलमय रस्त्यांतून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती.
----------------
लग्नसमारंभात तिघे जखमी
पडघा (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी थोडावेळ पावसासह अचानक आलेल्या वादळाने पडघा गावासह परिसरातील बोरीवली कुंरूद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावातील घरांचे तसेच इमारतीचे पत्रे, शेड, कौले उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सर्वात जास्त वाफाळे गावात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुरुंद येथील आदर्श विद्यालयाची संपूर्ण पत्राशेड उडून गेली असुन बोरीवली येथे लग्नसमारंभ सुरू असताना पत्रे उडून अंगावर पडल्याने तीन जण जखमी झाले. पडघा येथील अनेक इमारतींवरील पत्र्यासह शेड उडून गाड्यांवर पडून नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने नुकसान झाले. शिवाय विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा मंगळवारी दुपारपासून खंडीत झाला होता. महसूल विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पडघा - परीसरात चक्रीवादळाने पत्रे उडुन झालेले नुकसान