वर्तमान पत्रासोबत आले ठाकरे गटाचे पत्रक

वर्तमान पत्रासोबत आले ठाकरे गटाचे पत्रक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असा निर्णय देतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाने नियुक्त केलेल्या प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदा ठरवली. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वसामान्य नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मुद्दे समजावेत, यासाठी या मुद्द्यांचे एक पत्रक वृत्तपत्रातून घरोघरी वाटप करण्यात येत आहे. अंबरनाथ, कल्याण ग्रामीण, दिवा येथील भागांत घरोघरी या पत्रकाचे वाटप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेत बंड करीत वेगळा गट स्थापन केला. या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये शिंदे गटाने प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय निकाल दिला आहे, याविषयीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निकालातील ठळक मुद्दे पत्रकाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्यात येत आहेत. अंबरनाथ, दिवा, कल्याण ग्रामीण परिसरात सकाळच्या वृत्त पत्रासोबतच हे प्रसिद्धीपत्रक आल्याने नागरिकांमध्ये त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. सुनील प्रभू हेच प्रतोद आहेत. बहुमत चाचणीच्या वेळी व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. गटनेते म्हणून अजय चौधरी यांची केलेली निवडदेखील वैध ठरते. अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची केलेली निवड अवैध ठरते, निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारे निर्णय घेऊ नये, चिन्ह मिळालेला गट अपात्र ठरल्यास त्यांना नवीन चिन्ह घ्यावे लागेल, तसेच घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार फुटीर गटाला आपणच मूळ पक्ष आहोत, असा बचाव करता येणार नाही, असे अनेक मुद्दे या पत्रकातून मांडण्यात आले आहेत. या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना सोप्या भाषेत निकाल समजावून सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com