सीआरझेड क्षेत्रातून बालाजी मंदिराचे स्थानांतरण करा

सीआरझेड क्षेत्रातून बालाजी मंदिराचे स्थानांतरण करा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ ः नवी मुंबई येथील कांदळवन क्षेत्रावर उभरल्या जाणाऱ्या ७० कोटी रुपयांच्या तिरुपती बालाजी मंदिराच्या बांधकामाचा पर्यावरणवाद्यांनी जोरदार प्रतिरोध केला. या प्रकल्पाला स्थलांतरित करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या कांदळवन समितीला हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जूनला या परिसरात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी समूहांनी आक्षेप घेतल्यामुळे हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला होता.
सीआरझेड उल्लंघनाची आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) कास्टिंग यार्डाच्या भागातील खारफुटींच्या कत्तलांच्या संदर्भात चौकशी करण्याबद्दल नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी कांदळवन समितीकडे विनंती केली होती. या क्षेत्राच्या भागाचे मंदिरासाठी आता वाटप करण्यात आले आहे. ई-मेलवर नुकत्याच केलेल्या तक्रारीत नॅट कनेक्ट फाऊंडेशनने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, तसेच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) यांना हे निदर्शनास आणून दिले आहे की, सिडकोने एका विशिष्ट उद्देशासाठी भूभागाचे वाटप केले होते. आता एमटीएचएलचे काम पूर्ण झाल्यावर उच्च भरतीच्या जलप्रवाहाला असलेला अडथळा काढून टाकून कांदळवन क्षेत्राला पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तक्रारी मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (एमओइएफसीसी)च्या निर्देशांनुसार राज्य पर्यावरण विभागाने चौकशी करायला हवी होती; परंतु चौकशीचा निकाल आम्ही ऐकण्याच्या आधीच या मंदिर प्रकल्पाला सीआरझेड संमती मिळवण्यासाठी मे २३ ला महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) सिंगल-पॉइंट अजेंडा मिटिंगमध्ये सादर देखील केले, असे कुमार यांनी सांगितले. या बैठकीबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती. तसेच मंगळवारपर्यंत याबाबत एमसीझेडएमए वेबसाईटवर कोणताही अजेंडा प्रदर्शित केला गेला नव्हता.


मंदिर प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये मोठा हस्तक्षेप किंवा लुडबुड आहे. स्थानिक मच्छीमार समुदाय या भागाचा खाडीत प्रवेश करण्यासाठी उपयोग करत असे. या लोकांना एल ॲण्ड टी कास्टिंग यार्डने गेल्या चार ते पाच वर्षांपासून या भागात प्रवेश नाकारला होता. कास्टिंग यार्डचे काम पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पुन्हा मिळण्याची स्थानिक समुदायाला अपेक्षा होती; परंतु हा भाग धक्कादायकपणे बालाजी मंदिराला वाटप करण्यात आला.
- नंदकुमार पवार, संचालक, सागरशक्ती एनजीओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com