
वर्गखोलीच्या उंबऱ्यावर गुरुजी नतमस्तक
किन्हवली, ता. १ (बातमीदार) : वीस वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या एका शिक्षकाची बदली झाली, पण ती शाळा सोडताना त्या शिक्षकाने वर्गखोलीच्या उंबऱ्यावर नतमस्तक होऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शहापूर तालुक्यातील सोगाव शैक्षणिक केंद्रातील धोंडाळपाडा या शाळेत २० वर्षे ४ महिने अशा प्रदीर्घ अध्यापन सेवेच्या कालावधीनंतर जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या मदन वामन देसले या शिक्षकाने शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत वर्गखोलीच्या उंबऱ्यावर माथा टेकवून साष्टांग दंडवत घालून सहकार्याबद्दल ग्रामस्थांनाही धन्यवाद दिले. ज्या शाळेने माझ्यासारख्या एका शिक्षकाला आदर्श शिक्षक म्हणून घडविले त्या शाळेप्रती आदर व्यक्त करणे माझे कर्तव्य असल्याचे मदन देसले यांनी सांगितले. देसले यांच्या अध्यापन कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले असून ते विविध क्षेत्रांत उच्च पदावर सेवा बजावत आहेत. बदली झाल्यावर शिक्षकाने अशाप्रकारे शाळेचा निरोप घेतल्याने हा सर्वत्र कुतूहलाचा विषय झाला आहे.