रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरांत शिवसृष्टी

रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरांत शिवसृष्टी

अलिबाग, ता. २ : केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेही ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या मागणीनुसार किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरांत शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. त्याचबरोबर ब्रिटनमधील संग्रहालयात असलेली शिवरायांची वाघनखे आणि तलवार भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर सांगितले.

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ १ जूनपासून करण्यात आला आहे. तिथीनुसार सकाळी ८ वाजता नाशिक येथील बाळाराम मंदिराचे पुजारी महामंडळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. ध्वज पूजन, पालखी प्रस्थान, त्याचबरोबर भव्य ध्वजारोहण, नंतर सप्तसिंधू जलाभिषेक, सिंहासनारोहन मुद्राभिषेक हे विधी करण्यात आले.

राजसदर येथील या कार्यक्रमानंतर शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर सर्व मान्यवर यांनी जगदीश्वर मंदिर येथे जाऊन जगदीश्वराचे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सर्वश्री श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, बच्चू कडू, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, राम शिंदे, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त राजेंद्र भोसले, कोकण विभागीय परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील पवार, नितीन पावले, तसेच इतर लोकप्रतिनिधी, शिवाजी महाराजांचे वंशज आदी मान्यवर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com