
खड्डे मुक्तीसाठी मुंबईरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेने रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यापासून आपला बचाव करण्यासाठी आता तुम्हीच खड्डे दाखवा, अशी साद मुंबईकरांना घातली आहे. पालिकेने खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर जारी करत रस्ते अभियंत्यांचे मोबाईल नंबर व मोबाईल ॲप उपलब्ध केले आहे.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी दर वर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र मुंबईतील रस्त्यांची विशेष करून पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी रस्ते खड्डेमुक्त दिसावेत, यासाठी खड्डेमुक्तीसाठी थेट मुंबई महापालिकेने मुंबईकरांना साद घातली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असून २२७ प्रभागांतील रस्ते अभियंत्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध केले आहेत. तसेच एमसीजीएम २४×७ हे मोबाईल ॲप उपलब्ध केले असून प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल, असे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत खड्डा बुजला नाही, तर कारवाई कोणावर केली जाणार, यावर पालिकेने बोलणे टाळले आहे.