मोठागाव रेल्वे उड्डाणपुलाचा भार हलका

मोठागाव रेल्वे उड्डाणपुलाचा भार हलका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : मानकोली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा उड्डाणपूल सुरू करण्यापूर्वी मोठागाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणे आवश्यक होते. उड्डाणपुलाच्या कामासाठी केडीएमसीला ३० टक्के निधी उपलब्ध करून घ्यायचा होता; मात्र आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने पालिकेला हा निधी जमवणे शक्य नव्हते. अखेर हा भार राज्य शासनाने पेलला असून १६८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी मंजूर झाल्याने उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरुवात होऊन कल्याण-डोंबिवलीकरांना एक दिलासा मिळणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र आणि आसपासच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्‍या कल्याण रिंग रोडच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला गतिमान पर्याय देण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून कल्याण रिंगरोडची उभारणी केली जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रिंगरोडचे काम प्रगतिपथावर असून त्यातले महत्त्वाचे टप्पे पूर्ण होत आहेत. काही दिवसांपूर्वी मोठागाव ते दुर्गाडी या टप्प्याची निविदा जाहीर होऊ कामाला सुरुवात झाली; तर या मार्गाला जोडला जाणारा माणकोली मोठागाव यादरम्यान उल्हास नदीवर पुलाची उभारणी वेगाने सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. या पुलाच्या उभारणीनंतर मोठागाव हा भाग वाहतुकीच्या केंद्रस्थानी येणार आहे. याच पुलाच्या पुढील जोडरस्त्याला मोठागाव भागात रेल्वे मार्गिका छेदून जाते. या ठिकाणी पूलउभारणीची मागणी महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक सातत्याने खासदार डॉ. शिंदे यांच्याकडे करत होते. या कामात मात्र निधीचा अडथळा येत होता. या कामासाठी आवश्यक भूसंपादन आणि पुनर्वसन मोबदला देण्याची पालिकेला १६८ कोटींची आवश्यकता होती. मात्र आर्थिक स्थिती पाहता या निधीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेला आर्थिक मदतीची गरज होती. हा हिस्सा राज्य शासनाने उचलावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीही पाठपुरावा केला. अखेर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नुकताच या पालिकेच्या हिश्‍श्यापोटी १६८ कोटी रुपये देऊ केले आहेत. यात रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्‍या जागेचे भूसंपादन करण्यासाठी ५० टक्के हिस्सा अर्थात ३० कोटी रुपये मंजूर केले असून त्याअंतर्गत बाधितांच्या पुनर्वसनासाठी १३८ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
...
वाहतूक वेगवान होणार
उपलब्ध निधीमुळे मोठागाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार असून कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या कामालाही बळकटी मिळणार आहे. येत्या काही दिवसात हा मार्ग पूर्णत्वास आल्यास या भागाचे महत्व वाढण्यास मदत होणार आहे. मानकोली मार्गे शहरात येणाऱ्‍या वाहनांना रेतीबंदर येथील रेल्वे फाटकात अडकून पडावे लागत असे. तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्‍या नागरिकांनाही यात अडकून पडावे लागत असे. मात्र या रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर माणकोली पुलावरून येणारी वाहने ही कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट डोंबिवली प्रवेश करू शकणार आहेत. यामुळे त्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.

....
मोठागाव मानकोली उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्याचबरोबर मोठागाव रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल होणे गरजेचे होते. त्यासाठी तांत्रिक मंजुरी व निधीदेखील मंजूर झालेला होता. या निधीत महापालिकेचा ३० टक्के हिस्सा होता. पालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने तो पालिकेला भरता येत नव्हता. यामुळे हा निधी राज्य शासनाने द्यावा, अशी पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या निधीस मंजुरी मिळाली असून लवकरच या कामास सुरुवात होईल.
- दीपेश म्हात्रे, युवा सेना सचिव, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com