‘आंचल’ मोहिमेद्वारे होणार मातांचे संगोपन

‘आंचल’ मोहिमेद्वारे होणार मातांचे संगोपन

भिवंडी, ता. ५ : भिवंडीत सुरक्षित व निरोगी मातृत्वाचे संगोपन करण्यासाठी आणि त्यातून मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘आंचल’ ही नावीन्यपूर्ण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गर्भवती आणि बाळास दूध पाजणाऱ्या मातांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक तपासण्या व औषधोपचार देण्यात येणार आहेत. या मातांना सेवा देण्यासाठी शहरात जागोजागी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये तज्ज्ञांकडून आहार आणि तपासण्यांविषयी मार्गदर्शन करण्यात येते. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यामार्फत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

‌भिवंडीत जनजागृतीचा अभाव, अपुऱ्या पायाभूत आरोग्य सुविधा, आर्थिक संसाधनांचा अभाव आदींमुळे घरीच प्रसूतीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधीच प्रसूती झालेल्या महिलांना स्त्री-रोगतज्ज्ञांनी लिहून दिलेली औषधे, पौष्टिक प्रथिने, वाहतूक सहाय्य आणि इतर औषधी मदत त्यांना भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्या कार्यालयातून ‘आंचल’ उपक्रमाच्या माध्यामातून करण्यात येत आहे. सध्याच्या घडीला सुमारे ३५० गर्भवतींना विविध स्वरूपांत वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

‘आंचल किट’ मिळणार
विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, शरीरात कॅल्शियम आणि लोहाची कमतरता असलेल्या महिलांना तसेच ७ ते ९ महिन्यांच्या गर्भवती महिलांना संपूर्ण मातृत्व सुरक्षा सुविधा प्रदान करण्याचे ‘आंचल’चे उद्दिष्ट आहे. यासाठी महिलांना नागरी आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्तीकडे अथवा आरोग्य सेविकेकडे नोंदणी करावी लागेल, त्यानंतर त्यांना ‘आंचल किट’ प्रदान केले जाईल. या किटमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांनी लिहून दिलेल्या फॉलिक अॕसिडच्या गोळ्या, कॅल्शियम गोळ्या आणि प्रथिने समाविष्ट आहेत. नोंदणीकृत प्रत्येक महिलेला ‘आंचल कार्ड’ दिले जाते, ज्यामुळे त्या महिलेने घेतलेल्या आरोग्य आणि सुविधांचा व्यवस्थित पाठपुरावा करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com