ठाण्यात उभारणार मनोरुग्णालय

ठाण्यात उभारणार मनोरुग्णालय

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : कोरोनानंतर मानसिक आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, अत्याधुनिक मनोरुग्णालय उभे करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी ठाण्यात अत्याधुनिक ३ हजार २७८ खाटांचे मनोरुग्णालय उभाण्यात येणार आहे. ठाण्यातील मनोरुग्णालय हे १९०२ मध्ये बांधण्यात आले होते. त्याठिकाणी मनोरुग्णांवर उपचार केले जातात. मात्र खाटांची कमतरता, अत्याधुनिक उपचारांचा अभाव आणि कोविडनंतर वाढलेले मानसिक आजारांचे प्रमाण यामुळे अत्याधुनिक आणि सुसज्ज रुग्णालय बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला.
विशेष म्हणजे १९०२ नंतर राज्यात नवे आणखी एकही मनोरुग्णालय बांधण्यात आले नाही. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रशासकीय मंजुरी पाठवली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर ती पीडब्लूडीकडे वर्ग केली जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. रुग्णालयाचे स्ट्रक्चर तयार करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या रुग्णालयाच्या जागीच हे नवे रुग्णालय बांधले जाईल. त्यामुळे तिथल्या रुग्णांना काही कालावधीनंतर स्थलांतरित केले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यसेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार खोलीपासून, ऑपरेशन थिएटरमध्ये सायको सर्जरीदेखील केली जाईल. जवळपास ३६ महिन्यांचा कालावधी या रुग्णालयाच्या बांधकामासाठी लागणार आहे. हे रुग्णालय १८ महिन्यांत बांधण्याचा विचार होता. मात्र, त्यानंतर रुग्णसेवेत होणारी बाधा लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरू ठेवून अत्याधुनिक रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वर्क ऑर्डर निघाल्यावर २०२६ च्या अखेरपर्यंत हे अत्याधुनिक रुग्णालय सुरू होईल, असा मानस आहे.

----------------
रुग्णालयातील सोयी
जुन्या काळी अत्याधुनिक उपचार नव्हते. मात्र, आता या रुग्णालयात अत्याधुनिक उपचारांसह ब्रेन एमआरआय, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, २०० मुले एका वेळी बसू शकतील एवढे मोठे ऑडीटोरियम, लहान मुलांचे विशेष वॉर्ड, इमर्जन्सी सायकँट्रीक वॉर्ड, महिला आणि पुरुषांसाठी जनरल वॉर्ड, ऑब्झरवेशन वॉर्ड, क्रिमिनल वॉर्ड आणि टीबी वॉर्ड असणार आहे.


-------
ग्रीन इमारत
वॉटर हार्वेस्टिंग, सोलार पॉवर, झाडे लावणे, सोलार पॅनेल, दिवसा दिवे लावण्याची गरज लागणार नाही अशा खोल्या आणि एसी, फॅनची गरज लागणार नाही अशी इमारत बनवण्याचा प्रकल्प आहे. बंगळुरू येथील निमहांस म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसच्या धर्तीवर स्टेट ऑफ द आर्ट असे हे रुग्णालय उभारले जाईल. या रुग्णालयासाठी जवळपास ६०० कोटींहून अधिक अंदाजित खर्च असेल.

--------------
नवीन रुग्णालयात मनशक्ती क्लिनिक असेल. त्यामुळे रुग्णांना औषधाशिवाय उपचार देणे शक्य होईल. हास्यक्लब, योगा, मेडिटेशन, आनापाना, टेन्शन घालवण्यासाठी प्रयत्न, प्राणायम, मन सुदृढ ठेवण्यासाठी मनशक्ती क्लिनिक असणार आहेत. सध्या आहे तो कर्मचारी वर्ग काम करेल. मनोरुग्णांना जे काही उपचार लागतात ते सर्व देण्याचा प्रयत्न याठिकाणी असेल.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्यसेवा संचालक, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com