नव्या बांधकामांचे पाणी बंद करा

नव्या बांधकामांचे पाणी बंद करा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : पाणीटंचाईची समस्या अनेक भागांत निर्माण झाली आहे. रिजन्सी अनंतम येथे गेले अनेक दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी रविवारी येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी रहिवाशांसह आमदार पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पाणीकपात केल्यामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. असे असताना नवी बांधकामे मात्र शहरात जोरात सुरू असून त्यांना दिले जाणारे पाणी बंद करून नागरिकांना प्यायला पाणी द्या, अशी मागणी आमदार पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली.
यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार एमआयडीसीकडून १५ दिवसांतून एकदा पाणीकपात केली आहे. यामुळे अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. रिजन्सी अनंतम हे बडे गृहसंकुल असून या ठिकाणी नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून घर घेतले आहे. सध्याच्या घडीला येथील रहिवाशांना एक तासदेखील पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार पाटील यांच्याकडे रहिवाशांनी समस्या मांडल्याने पाटील यांनी येथील रहिवाशांची रविवारी भेट घेतली. त्यानंतर सोमवारी आमदार पाटील यांनी रहिवाशांसह एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सी. पी. आव्हाड यांची भेट घेतली. या वेळी डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, संदीप पाटील, रहिवाशी रफिया कुलकर्णी, दिशा करिया, लता अरगडे यांसह अनेक रहिवासी उपस्थित होते.
याविषयी आमदार पाटील म्हणाले, केडीएमसीतील २७ गावात पाणीटंचाई आहे. अमृत योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. मंजूर पाण्याचा कोटा मिळत नाही. पाण्याचा कोटा वाढविल्याशिवाय पाणीसमस्या सुटणार नाही. तात्पुरता दिलासा देण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाणीटंचाई असतानादेखील नवी बांधकामे शहरात सुरू असून त्यांना पाणी दिले जात आहे. या बांधकामांचे पाणी बंद करून ते नागरिकांना प्यायला द्यावे, अशी मागणी या वेळी आमदार पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com