शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : गेट वे ऑफ इंडियाच्या गाभाऱ्यात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी यासाठी आराखडा आखला आहे. अनेक पर्यटक इथे भेट देत आहेत.

या प्रदर्शनात वाघनखे, धनुष्य-बाण, तलवारी, चिलखत, भाले, कट्यार, जांबिया, खंजीर, बिचवे, गुर्ज, तोफांचे गोळे, पट्टा, चिलखत यांसारख्या शस्त्रास्त्रांचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पाहता येतील. पुरातन काळात जगातल्या प्रमुख पाच शस्त्र परंपरामध्ये भारतीय शस्त्र परंपरा एक होती. भारतीय शस्त्र परंपरेतही राजपूत, मराठा, मोगल यांच्या शस्त्रास्त्रांची रचना पूर्णत: वेगळी असे. या प्रदर्शनात तलवारीचे विविध प्रकार अन् त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेता येतील. तीन फुटी वक्राकार समशेर, चार फुटी लांब सरळ तलवार म्हणजे मराठा धोप, राजपूत पद्धतीची वरच्या बाजूला किंचितशी मोठी होत जाणारी दुधारी तलवार म्हणजे खांडा, हत्तीचा पाय तोडण्यासाठी वापरली जाणारी तबर (कुन्हाड), कटारींचे प्रकार, लहान छुपी शस्त्रे पर्यटकांना बघायला मिळत आहे. या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत अत्युच्च दर्जाच्या पोलादाचा वापर केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रदर्शनाचे व्यवस्थापन चेतन बाविस्कर यांनी केले आहे.
---
प्रत्येक शस्त्र वेगळे
शिवकालीन शस्त्रे हा प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय आहे. या शस्त्राच्या निर्मितीचे तंत्र, ती कोणासाठी व कोणत्या प्रयोजनासाठी निर्मिली गेली, याचेही काही संदर्भ आहेत. योद्ध्यांकडून युद्धावेळी वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे तुलनेत मजबूत आणि पूर्णत: वेगळी असत. नजराणा म्हणून दिली जाणारी नक्षीदार शस्त्रास्त्रे वेगळ्या धाटणीची असत. या वैविध्यपूर्ण शस्त्रास्त्रांच्या इतिहासाचा पट अभ्यासक नीलेश अरुण सकट आणि क्युरेटर डॉ. आदिती निखिल वैद्य यांच्याकडून उलगडून दाखवला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com