इच्छुकांमधील स्‍पर्धा आदिवासीवाड्यांच्या पथ्‍यावर

इच्छुकांमधील स्‍पर्धा आदिवासीवाड्यांच्या पथ्‍यावर

कर्जत, ता. ७ (बातमीदार)ः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आजी -माजी आमदारांसह इच्छुक नेतेमंडळी तथा नव्याने उदयास येऊ पाहणारी तरुण मंडळीही स्पर्धेत उतरल्‍याचे चित्र सध्या कर्जत विधानसभा मतदार संघात तसेच कर्जत समाविष्ट असलेल्या लोकसभेच्या मावळ मतदार संघात पाहायला मिळते आहे. त्‍यांच्याकडून ग्रामीण भागातील समस्‍यांची दखलही घेतली जात आहे.
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावे, वाड्या-पाड्यांवर तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कर्जत विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार नितीन सावंत यांनी काही वाड्यात बोअरवेल खोदून ग्रामस्थांची तहान भागवत मतदारांची वाहवा मिळवली. त्यानंतर त्वरित राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनीही काही वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनीही पाणी प्रश्नावर बारकाईने लक्ष देत काही अंशी पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे राजकीय श्रेयवादाच्या स्पर्धेत आदिवासी बांधवांना पाणी मिळल्याने उमेदवारांमधील स्पर्धा आदिवासी वाड्यांच्या पथ्यावर पडल्‍याचे दिसून येत आहे.
अकरा महिन्यांपूर्वी राज्यातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडून तथा घडवून महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले आणि नव्याने जुळलेल्या राजकीय समिकरणाने भाजप -शिंदे शिवसेना गटाने सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यातील सर्वच मतदार संघात याचे परिणाम दिसून आले. कर्जत विधानसभा मतदार संघही त्‍याला अपवाद नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेतून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे तर उद्धव ठाकरे गटातून नितीन सावंत तर राष्ट्रवादीतून तीन टर्म आमदारकी भोगलेले माजी आमदार सुरेश लाड आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे निवडणूक रिंगणात आहेत. शेकाप आणि काँग्रेसकडून अद्याप कर्जत विधानसभा मतदार संघासाठी नाव पुढे आलेले नाही. मनसे अन्य छोटे पक्ष येथे आहेत परंतु त्यांचा या मतदार संघात फारसा प्रभाव पाहायला मिळत नाही.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी मात्र आतापासूनच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. या लोकसभा मतदारसंघात कर्जत विधानसभा मतदार संघ समाविष्ट असल्याने इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काहींचे भावी खासदार म्हणून बॅनरही झळकत असून त्यांच्यातर्फे छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातून माधवी जोशी हे नवे नाव समोर आले आहे. त्यांचे बॅनर सर्वत्र झळकत आहे. त्यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र अद्याप कोणत्‍या पक्षाच्या झेंड्याखाली वा अपक्ष म्‍हणून लढणार हे त्‍यांचे निश्चित नाही. मावळ मतदार संघावर काँग्रेसने दावा केला असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचेही तशा आशयाचे बॅनर समाजमाध्यमांवर झळकत आहेत.

मावळमध्ये सेनेचे प्राबल्य
२०१४ पर्यंत कर्जत विधानसभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात समाविष्ट होता. मात्र दहा वर्षांपूर्वी केलेल्या मतदारसंघाच्या नव्या आखणीत हा मतदार संघ मावळ लोकसभा मतदार संघात समाविष्ट करण्यात आला, तेव्हापासून झालेल्या मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचेच प्राबल्य आहे. शिवसेनेचे खासदार गजानन बाबर त्यानंतर सलग दोन टर्म शिवसेनेचे आता शिंदे गटात सामील झालेले श्रीरंग बारणे हे निवडून आले आहेत.

मविआकडून काँग्रेसचा दावा
२०१९ ला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला. गेल्‍या दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने आता या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष दावा करीत आहे. खासदार बारणे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गट आता नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. तर भाजपकडे सद्या तरी या लोकसभा मतदार संघासाठी सक्षम चेहरा दिसून येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com