आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तुंना प्राधान्य द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तुंना प्राधान्य द्या
आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तुंना प्राधान्य द्या

आदिवासी महिलांनी बनवलेल्या वस्तुंना प्राधान्य द्या

sakal_logo
By

वसई, ता. ८ (बातमीदार) ः बांबूपासून हस्तकला व रोजगार म्हणजे आत्मनिर्भर होणे. बांबू वातावरणासाठी देखील हातभार लावतो. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे सक्षमीकरण ‘सेवा विवेक’ संस्था करत आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. प्लास्टिक वस्तूंपेक्षा आदिवासी महिलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, हे सरकारला सांगणार असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. वसई येथील भालिवली येथील कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपालांनी ‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेच्या भालिवली येथील प्रकल्पाला भेट देऊन संस्थेकडून यशस्वीरित्या बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना बांबू हस्तकला प्रमाणपत्र वितरण केले. तसेच सर्वाधिक रोजगार प्राप्त करणाऱ्या ३ महिलांचा सन्मान केला.

या वेळी राज्यपाल बैस म्हणाले, बांबू उत्पादनांपासून नफा मिळेल, तसेच लागवड केल्याने अन्य ठिकाणाहून बांबू आणण्याचा वेळ आणि पैसा वाचेल. विदेशी पाहुण्यांना माझ्यातर्फे बांबू हस्तकलेपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू यापुढे मी भेट देईन. महिलांना ‘सेवा विवेक’ने एकत्रित आणून त्यांना प्रशिक्षण देणे, रोजगारासाठी प्रोत्साहित करणे हे अथक परिश्रमाचे काम आहे. गेली बारा वर्षे निष्ठेने काम केले जात आहे हे विशेष आहे. आदिवासी महिलांनी बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या वस्तू जगाच्या बाजारात विकल्या जात आहेत, याची माहिती मिळताच राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली. ‘सेवा विवेक’ संस्थेच्या कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये कौतुक केल्याचे यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे लुकेश बंड यांनी सांगितले. या वेळी ११०० बांबू रोपांची लागवड करण्याचा संकल्प ‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेने केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप फाटक यांनी केले. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वणगा, आरएसएसचे चंद्रकांत सुर्वे, ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे, प्रमुख प्रदीप गुप्ता, लुकेश बंड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य सादर केले.
-------------------------------
‘मी देखील शिल्पकार’
मला लहानपणापासून लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याची आवड आहे. ती आजतागायत जपली आहे. लाकडापासून ६ फुटांची गणेशमूर्ती तयार केली. तसेच अशा अनेक मूर्ती तयार केल्या असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील महिलांचे पर्यावरणपूरक कार्य पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले.