कल्याणमध्ये भाजप - शिंदे गटात धुसफुस

कल्याणमध्ये भाजप - शिंदे गटात धुसफुस
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण लोकसभा क्षेत्रात शासनाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकासकामांसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहेत; मात्र कल्याण विधानसभा मतदार क्षेत्रात वेगळेच चित्र दिसत आहे. डोंबिवलीत कामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दोन्ही पक्षातील नेते एकत्र आले होते; मात्र कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात याच पक्षातील पदाधिकारी एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदलीप्रकरणानंतर आता आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखावर गोळीबार केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला. सध्याच्या घडीला विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळे तसेच सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमासाठी शिवसेना व भाजप पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहेत. यात मुख्यतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लक्ष वेधते.

कल्याण लोकसभा क्षेत्रात सारे काही आलबेल आहे असे चित्र आहे; मात्र विधानसभा क्षेत्रात वेगळेच चित्र रंगत आहे. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात कारागृहात असले तरी त्यांच्या पत्नी आता रणांगणात उतरल्या आहेत. त्या मुलांसह त्या प्रभागात फिरत आहेत. तर महेश गायकवाड हे उपचार घेऊन कल्याणमध्ये परतल्यावर त्यांनी त्वरित गणपत गायकवाड यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली.

कल्याणमध्ये भाजपची बॅनरबाजी
भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांनी विविध भूमिपूजन कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांचीदेखील त्यांना साथ आहे. त्यांच्याकडून शक्तीप्रदर्शनदेखील करण्यात येत आहे. गायकवाड यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात एक कोटी ९५ लाखांची विकासकामे होत आहेत. त्या कामांचा तपशील देणारे मोठमोठे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर आमदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जय प्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही फोटो बॅनरवर छापला आहे; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या एकाही नेत्याला बॅनरवर स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे दोन्ही पक्षातील हा वाद स्पष्ट होत आहे.

स्थानिक भाजप कार्यकर्ते गायकवाड यांच्या पाठिशी
गोळीबार प्रकरणानंतर भाजप नेत्यांची बैठक झाली होती. यामध्ये शिंदे आणि त्यांच्या गटातील कोणत्याही नेत्याचे फोटो बॅनरवर वापरायचे नाहीत, असा निर्णय त्यात घेतला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे चित्र आहे. याबद्दल भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता, बॅनरवर काय नाही याकडे लक्ष देऊ नका, असं उत्तर त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com