राजकीय खलबते सुरू

राजकीय खलबते सुरू

विनायक पवार : सकाळ वृत्तसेवा
तारापूर, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारावरून खलबते सुरू आहेत. जिल्ह्याची लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहेत. तरी कोणत्याही पक्षांकडून आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. तुल्यबळ उमेदवारांसाठी चाचपणी सुरू असून, इच्छुक मात्र आपल्याला उमेदवारी मिळेल आणि प्रचाराला सुरुवात करता येईल, या प्रतीक्षेत आहेत. राजकीय बलाबल आणि पुढे केंद्रात जाण्यासाठी सक्षम उमेदवासाठी परीक्षा ठरणार आहे.
पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, असे समोर येत आहे. यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेच्या महिला संघटिका भारती कामडी यांचे नाव अंतिम झाले असले, तरी त्यांना तिकीट मिळेल का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर दुसरीकडे उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्येही महायुतीप्रमाणे अंतर्गत धुसफुस असल्याचे एकंदरीत दिसत आहे. काँग्रेसचे माजी दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांची भेट घेऊन उमेदवारीची आशा व्यक्त केल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीकडून भारती कामडी यांच्यासह काशिनाथ चौधरी, सचिन शिंगडा यांची नावे चर्चेत आले आहेत.
महायुतीमार्फत शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत असले, तरी त्यांना भाजपचा तीव्र विरोध आहे. वसईत मात्र यावर घुमजाव झाला आहे. भाजपमार्फत दिवंगत माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली जावी, यासाठी भाजप आग्रही आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेले संतोष जनाठे यांच्या नावाचीही चर्चा होऊ लागली आहे. अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बोलून समज दिल्याचे बोलले जात आहे. राजकीय वातावरण पाहता एकंदरीत राजेंद्र गावित पालघर लोकसभेचे पुढील उमेदवार असतील असेच सध्या तरी दिसत आहे. भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी विलास तरे यांचे नाव पुढे येत होते.
---------------------

गुलदस्त्याकडे लक्ष
खासदारकीसाठी निर्णायक मते वसई, विरार, नालासोपारा या तीन मतदारसंघांत आहेत. या मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य दिसून येते. खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात बविआ शेवटच्या क्षणाला आमदार राजेश पाटील यांना खासदार म्हणून तिकीट देऊन आपली ताकद पणाला लावेल. महाविकास आघाडी, महायुती यांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे गुलदस्त्यात ठेवलेली प्रमुख भूमिका अचानक जाहीर करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
---------------------
तिरंगी लढत
पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुती व बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे शिवसेना यांच्याकडे पालघर लोकसभा उमेदवारी गेल्याने महाविकास आघाडी त्यांना मदत करणार आहे. डहाणू तालुक्यातील जनसंपर्क असलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे तरुण डहाणू तालुकाध्यक्ष काशिनाथ चौधरी यांचे अचानक नाव उमेदवारीसाठी समोर येऊ लागले आहे
---------------------
निष्फळ चर्चा
भारती कामडी यांना उमेदवारी देण्यापूर्वी विचार करावा, यासाठी मातोश्रीवर शरद पवार गटाची बैठक झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, अटी-शर्तीवर ठाकरे शिवसेना भारती कामडी यांना उमेदवारी देण्यावर ठाम असल्याचे दिसून आल्याने ही चर्चा निष्फळ ठरू शकते.
------------------

लोकसभेची रंगत वाढणार
एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र लोकसभेसाठी उभे राहिले असताना तिसरीकडे बहुजन विकास आघाडीने प्रचाराचा जोर लावल्यास या लोकसभेची रंगत आणखीन वाढणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात तिरंगी लढतीत कोणाचा उमेदवार विजयी होईल आणि केंद्रात जाईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.
----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com