ठाणे जिल्ह्यासाठी १३ हजार १८४ शाईच्या बाटल्या

ठाणे जिल्ह्यासाठी १३ हजार १८४ शाईच्या बाटल्या

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्यात येत आहे. त्यात मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन, याप्रमाणे १३ हजार १८४ शाईच्या बाटल्या लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा क्षेत्रात येत्या २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या तिन्ही मतदारसंघात ६५ लाख ६७१ इतक्या मतदारांची नोंद केली आहे. यात ३५ लाख ६ हजार ८२ पुरुष; तर २९ लाख ९४ हजार ३१५ स्त्री मतदारांचा समावेश आहे. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ६ हजार ५९२ मतदान केंद्रे सज्ज ठेवली आहेत. यामध्ये सहा हजार ५२४ मूळ मतदान केंद्रे; तर सहायकारी मतदान केंद्रे ६८ आहेत. तसेच एकूण मतदान केंद्रांचे ठिकाण एक हजार ९३१ असतील. तर, पाच हजार ११६ पक्क्या इमारतीतील मतदान केंद्र, पार्टीशन मधील ८०७, मंडपामधील ६३३ आणि गृहनिर्माण सोसायटीमधील ३६ मतदान केंद्रे असणार आहेत.

लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना, कोणत्याही साधासामग्रीची कमतरता भासू नये, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनदेखील सतर्क झाला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीत शाईला विशेष महत्त्व आहे. ज्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यात येत असते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेतील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन याप्रमाणे शाईच्या बाटल्यांचे नियोजन केले असून १३ हजार १८४ शाईच्या बाटल्या लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अशी आहे पद्धत
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलिंग ऑफिसर) मतदाराच्या डाव्या बोटावर शाई लावलेली आहे की नाही, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करू देत नाही, ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताचे बोट नसेल, तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

कुठे किती शाईच्या बाटल्या?
मतदारसंघ मतदान केंद्र शाईच्या बाटल्या
ठाणे - दोन हजार ४४८ - ४ हजार ८९६
कल्याण - एक हजार ९५५ - ३ हजार ९१०
भिवंडी - दोन हजार १८९ - ४ हजार ३७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com