आदिवासी महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

आदिवासी महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

आदिवासी महिलांचे गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
पेण, ता. २५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाच आदिवासी वाड्यांना रस्ता, पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत. मात्र, संबंधित प्रशासन दीड वर्ष उलटून गेले तरीही येथील पाणी आणि रस्त्याचे प्रश्न सोडवू शकले नसल्याचे अखेर आदिवासी महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
येथील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाच आदिवासी पाड्यांना शुद्ध पिण्याच्‍या पाण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्‍या वतीने जलजीवन मिशनअंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, दीड वर्षे उलटूनही अद्याप जलजीवन मिशन योजनेअंतर्गत असलेली कामे अपूर्ण असल्‍याने आदिवासी वाडीतील बांधवांना पिण्याच्‍या शुद्ध पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांना वारंवार तक्रार करूनही त्‍यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शिवाय ठेकेदारालादेखील जाब विचारण्यात आलेला नसल्‍याने आदिवासी बांधवांकडून रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. सध्या उन्‍हाळा तीव्र असल्‍याने अनेक विहिरी, ओढे आटले आहेत. त्‍यामुळे पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. मात्र, प्रशासनाला कोणतेही सोईरसुतक नसल्‍याने अखेर येथील आदिवासी महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वाड्यावर शुद्ध पाण्याची सोय करण्यात येणार नाही, तोपर्यंत हटणार नसल्‍याची भूमिका यावेळी आदिवासी महिलांनी घेतली. दरम्‍यान, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ व इतर अधिकाऱ्यांनी दोन्ही वाड्यांसाठी तत्काळ पाच हजार लिटरच्या तीन सेन्टेंन्सच्या पाणी साठवणूक टाक्या दिल्या जातील, असे आश्वासित केले. यावेळी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, मानसी पाटील, राजू पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पाचपोंड, रमेश राठोड, बोरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com