मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहभेट

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहभेट

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ३० : लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई उपनगर जिल्हा जनगणनेनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ९३.५६ लाख असून जिल्ह्यात ८७ गावांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘गृहभेट’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांमधील मतदानाबाबतची उदासीनता दूर करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. गृहभेटीमध्ये मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने आपला (मतदारांचा) कसा फायदा होणार आहे, हे सांगून हे मतदान केंद्र पातळीवर तयार करण्यात आलेल्या पथकाचे मुख्य काम आहे.
--
कोणाचा सहभाग?
उपक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य सेविका व आशा सेविका, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, महापालिकेच्या नियोजन विभागाचे कम्युनिटी ऑर्गनायझर, कर निर्धारण आणि संकलन विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता उपक्रमांमध्ये क्षेत्रीयस्तरावर काम करणारे कनिष्ठ अवेक्षक व महानगरपालिका मुकादम, ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ योजनेचे संस्थाचालक, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांसह नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांचा समावेश आहे. 
----
एका मतदान केंद्रावर चार जणांचे पथक
एका मतदान केंद्रावर अंदाजे १,२०० मतदार आहेत, हे गृहीत धरून कमीत-कमी तीन ते चार जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. एका पथकाने किमान ३०० कुटुंबीयांची भेट घेत त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या गृहभेटीत प्रामुख्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रांवर प्राधान्य देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com