मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

Published on

(प्राथमिक बातमी)
मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक
चालकाच्या कोठडीत दोन दिवस वाढ
वरळी अपघात

मुंबई, ता. ९ ः वरळी येथील अपघातात महिलेचा जीव घेतल्यानंतर दोन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य आरोपी मिहीर शहा (वय २४) याला मंगळवारी (ता. ९) बेड्या ठोकण्यात आल्या. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी मिहीर याच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला.
मिहीरसोबत त्याला पळवून लावणाऱ्या, घरात आसरा देणाऱ्या आणखी ११ ते १२ कुटुंबीय, मित्रमंडळींनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली; मात्र त्याबाबत माहिती देण्यास चौधरी यांनी नकार दिला. मिहीर यालाच अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. मिहीरने मंगळवारी सकाळी पश्चिम उपनगरातील एका पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली, अशीही माहिती पुढे येत आहे; मात्र त्यास पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, अपघात घडला तेव्हा मिहीरसोबत गाडीत हजर असलेला शहा कुटुंबीयांचा वाहनचालक राजऋषी बिदावत याला मंगळवारी शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत धाडले. अपघाताआधी व नंतर घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत तपास करून पुरावे गोळा करायचे आहेत; मात्र बिदावत नेमकी माहिती देत नाही. तसेच तो पोलिसांची दिशाभूल करतो आहे, असा संशय असून त्याला व मिहीरला समोरासमोर बसवून चौकशी करणे क्रमप्राप्त आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयासमोर केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने बिदावत याला ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
...
घटनाक्रम असा
- शनिवारी रात्री तीन मित्रांसोबत मिहीर याने मद्यप्राशन आणि जेवण केले. रात्री ११.१५च्या सुमारास हे चौघे या बारमधून बाहेर पडले. अपघात घडलेल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसले. ही गाडी बोरिवलीच्या दिशेने निघाली.
- बोरिवली परिसरातच राहणाऱ्या तिन्ही मित्रांना घरी सोडल्यावर मिहीरने चालक बिदावत याच्याकडे लाँग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली.
- गाडी मरीन ड्राईव्ह परिसरात आली. तेथून परत घरी जाताना मिहीरने गाडी चालविण्यास घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळी येथे मिहीरच्या गाडीने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर आले. त्याच वेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले. मात्र कावेरी यांची साडी चाकात गुरफटली. त्यामुळे त्या बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या.
- याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि पेशाने चालक असलेल्या बिदावत याला होती; तरी त्याच अवस्थेत दोन किलोमीटर अंतर कापल्यावर मिहीरने गाडी थांबवली. चालकाच्या मदतीने कावेरी यांना बाहेर काढले. रस्त्यावर ठेवले. तेथे चालकाने गाडीचा ताबा घेतला. त्याने कावेरी यांच्यावरून पुन्हा गाडी चढवत पुढे नेली.
- ही गाडी वांद्रे कलानगर येथे बंद पडली. तत्पूर्वी मिहीरने शिवसेनेचे उपनेते असलेल्या आपल्या वडिलांना, राजेश शहा यांना फोनवरून सर्व हकिगत सांगितली; मात्र मिहीरला पोलिस ठाण्यात पाठवण्याऐवजी शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच अपघाताची जबाबदारी चालक बिदावत याच्यावर ढकलण्याचा कट आखला. शहा यांनी या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा असलेली कारही गायब करण्याचा बेत आखला होता; मात्र वेळेत पोचलेल्या पोलिसांनी तो उधळला.
- कलानगर येथून काही अंतर पायी गेल्यानंतर मिहीर याने रिक्षा पकडली. सीसीटीव्ही चित्रणातून ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. कलानगर येथून तो गोरेगाव येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे सुमारे दोन तास त्याने झोप काढली. त्यानंतर तेथे आलेल्या बहिणीने मिहीर याला आपल्यासोबत नेले. गोरेगाव येथून तो बोरिवली येथे आपल्या घरी गेला. त्यानंतर मिहीर, त्याची आई, बहीण बेपत्ता झाले. तिघांनी आपापले फोनही बंद केले होते.
- रविवारी सकाळी वरळी पोलिसांनी शहा आणि बिदावत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री या दोघांना अटक करण्यात आली.
मिहीरसाठी देशभरातील विमानतळांना लूकआऊट नोटीस देण्यात आली. मिहीरच्या शोधार्थ विविध पथके तयार केली गेली.
...
मिहीरबाबत प्रश्न
१ मित्रांना घरी सोडल्यानंतर अपघात होईपर्यंत काय काय केले? पोलिसांना संशय आहे की, मित्रांना घरी सोडल्यानंतर मिहीर आणखी दारू प्यायला किंवा अमली पदार्थांचे सेवन केले. तो वरळी, कुलाबा किंवा दक्षिण मुंबईतील पब, सोशल क्लबमध्ये गेला.
२ दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडी का थांबवली नाही?
३ कलानगर येथून पसार झाल्यानंतर अटक होईपर्यंत कुठे होता, कोणासोबत होता आणि या दोन दिवसांत त्याने काय काय केले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.