पहिल्या दिवशी ३८ उमेदवारी अर्जांची विक्री

पहिल्या दिवशी ३८ उमेदवारी अर्जांची विक्री
Published on

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीसाठी आज (ता. २२)पासून उमेदवारी अर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे. मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रमुख उमेदवारांपैकी माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा अपवाद वगळता अन्य १४ इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले. आमदार गीता जैन यांनी भाजप, शिवसेना, तसेच अपक्ष उमेदवार म्हणूनदेखील निवडणूक अर्ज घेतला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानुसार आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, मात्र १४ इच्छुक उमेदवारांनी ३८ अर्जांची खरेदी केली. महायुतीमध्ये मिरा-भाईंदर मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिंदे गट येथून निवडणूक लढविणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे हा मतदारसंघ भाजपला मिळाला तरी उमेदवार कोण, हेदेखील निश्चित झालेले नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून इच्छुक असलेल्या आमदार गीता जैन यांनी उमेदवारी अर्ज घेताना भाजप, शिवसेना व अपक्ष म्हणून नोंद केली. त्यामुळे गीता जैन या भाजप अथवा शिंदे गट, त्याचप्रमाणे वेळ आल्यास अपक्ष म्हणून लढण्याचीदेखील तयारी करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपकडून ॲड. रवी व्यास आणि सुरेश खंडेलवाल यांनीदेखील अर्ज घेतले असून उमेदवारीच्या शर्यतीत असलेले नरेंद्र मेहता यांनी मात्र पहिल्या दिवशी अर्ज घेतला नाही.

शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक विक्रम प्रताप सिंह आणि त्यांची पत्नी निशा सिंह यांनी अर्ज घेतले आहेत. त्याचप्रमाणे विक्रम यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतला आहे. महायुतीत शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा ठोकला असून स्थानिक पातळीवर शिंदे गटाकडून विक्रम प्रताप सिंह यांच्या नावाची शिफारस आहे. महायुतीचा आणखी एक घटक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून आसिफ शेख यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम हेदेखील निवडणूक लढण्याच्या तयारीत असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज खरेदी केला आहे. मविआकडून मुझफ्फर हुसेन यांनी काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज घेतला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाबुराव शिंदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतल्याची नोंद आहे. याव्यतिरिक्त अर्ज घेणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक हंसूकुमार पांडे, तसेच अन्य अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com