

ठाणे विधानसभेत बंडखोरी?
संजय भोईर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करीत आघाडी घेतली आहे. यात शिवसेना शिंदे गट आग्रही असलेल्या ठाणे विधानसभेचा उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर हेदेखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी मंगळवारी (ता. २२) ठाणे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे ठाणे विधानसभेत महायुतीत बंडखोरी होणार आहे.
शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे एक ब्रीद वाक्य निर्माण झाले होते; मात्र याला तडा देत शिवसेनचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे विधानसभा मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे शिवसेना शिंदे गटाकडे गेले. या वेळी लोकसभेच्या निवडणुकीत आमदार संजय केळकर यांनी मदत केली नसल्याचा दावा करत शिंदे गटाकडून नाराजीचा सूर उमटू लागला होता. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील ठाणे विधानसभेतून लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करत या मतदारसंघावर दावा केला होता. अशातच भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीची आपली पहिली यादी जाहीर करीत आघाडी घेतली आहे; मात्र ज्या ठाणे विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला होता. त्या जागेवर विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी याविरोधात उघड भूमिका घेतली आहे, पण ही भूमिका केवळ भोईर यांची नसून शिंदेंच्या शिवसैनिकांचीही आहे. भाजपसाठी काम न करण्याचा अनेकांनी संकल्प केला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी संजय भोईर यांनी दखील अर्ज घेतला आहे, तसेच ते अपक्ष निवडणूक लढवण्यावरदेखील ठाम असल्याचे संजय भोईर यांनी स्पष्ट केले.
मीनाक्षी शिंदेंनी थोपटले दंड
लाडकी बहीण योजनेचा ठाण्यातदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ठाणे शहर विधानसभेतून महिलांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व हवे, अशी महिला आघाडीची मागणी असल्याचे सांगत माजी महापौर मीनाक्षी शिंदे ठाणे शहर विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यानुसार त्यांनीदेखील मंगळवारी ठाणे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.