

मतविभागणीने नऊ जणांना विजयाची हुलकावणी
- महायुतीचे पाच, मविआचे चार उमेदवार किरकोळ मतांनी पडले
बापू सुळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईच्या विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांची भाऊगर्दी अनेकांच्या पथ्यावर, तर काहींच्या यशावर पाणी फिरवणारी ठरली आहे. मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत असतानाही नऊ मतदारसंघांत प्रमुख उमेदवाराशिवाय इतर उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे नऊ जणांना विजयाची हुलकावणी मिळाली आहे. त्यामध्ये महायुतीचे पाच, तर महाविकास आघाडीचे चार उमेदवार आहेत.
जोगेश्वरी
जोगेश्वरी विधानसभेत दोन्ही शिवसेनेमध्ये थेट लढत झाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना ७७,०४४, तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांना ७५,५०३ मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे बाळा नर अवघ्या १,५४१ मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, निवडणूक रिंगणात असलेल्या मनसेच्या भालचंद्र अंबुरे यांना १२ हजारांहून अधिक, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने २,८०० मते घेतली आहेत. परिणामी मतविभागणीचा नर यांना फायदा झाला असून वायकर यांना फटका बसल्याचे चित्र आहे.
दिंडोशी
दिंडोशी विधानसभेतही दोन्ही शिवसेनेत लढत झाली असून, ठाकरे गटाचे उमेदवार सुनील प्रभू हे ६,१८२ मताधिक्याने निवडून आले. त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केला आहे. दरम्यान, या मतदारसंघात मनसेचे उमेदवार भास्कर परब यांनी तब्बल २० हजार ३०९ मते घेतली आहेत. दोन्ही शिवसेनेत लढत असतानाच मनसेने घेतलेली मते पाहता मराठी मतांच्या विभागणीचा थेट निकालावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
वर्सोवा
वर्सोवा विधानसभेत मविआचे उमेदवार हारून खान यांना केवळ १,६०० मतांनी विजय मिळाला आहे. येथे भाजप उमेदवार भारती लव्हेकर यांनी मोठी आघाडी घेतलेली असताना शेवटच्या टप्प्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू पेडणेकर यांना ६,७५२ मते मिळाली असून, मनसेनेही चांगली मते घेतली आहेत. निवडणूक रिंगणात जास्त उमेदवार असल्याने येथील निकाल वेगळा लागल्याचे चित्र आहे.
कुर्ला
कर्ला विधानसभेतही शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात थेट लढत झाली. यामध्ये विजयी उमेदवार मंगेश कुडाळकर यांना ७२,७६३, तर समोरील उमेदवार मनीषा मोराजकर यांना ६८,५७६ मते मिळाली. अवघ्या ४,१८७ मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, येथील मनसे आणि एमआयएमच्या उमेदवाराने चांगली मते घेतली आहेत. याच मतविभागणीचे चित्र निकालात दिसत आहे. याशिवाय कलिना, मानखुर्द, माहीम विधानसभेच्या निकालावरही मतविभागणीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. निवडणूक रिंगणात मराठी उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतविभाणी होऊन त्याचा थेट परिणाम झाल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.