

लांब केस आवडत नसल्याने लावली कैची
दादर स्थानकातील घटनेतील आरोपीचा खुलासा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः दादर रेल्वेस्थानक येथे भरगर्दीत एका १९ वर्षीय तरुणीचे केस कापल्याप्रकरणी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. दिनेश गायकवाड (वय ३५) असे त्याचे नाव असून तो चेंबूर येथील रहिवासी आहे. मला तरुणी-महिलांचे लांब केस आवडत नसल्याने मी ते कापल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
माटुंगा रोड येथील महाविद्यालयात जाण्यासाठी पीडित तरुणी सोमवारी (ता. ६) कल्याण येथून दादर स्थानकात उतरली. दादर पश्चिमेकडे जाणाऱ्या पुलावरून जाताना तिला काहीतरी टोचल्यासारखे जाणवले. मागे वळून पाहिले असता, एक व्यक्ती बॅग घेऊन घाईघाईने जाताना दिसली, तसेच खाली केस पडल्याचे दिसले. त्यामुळे तिने स्वतःच्या केसांना हात लावून पाहिले असता तिचे केस अर्धवट कापल्याचे आढळले. पीडित तरुणीने त्या व्यक्तीचा पाठलाग केला; पण तो गर्दीतून पसार झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यानुसार, मंगळवारी (ता. ७) सकाळी १० वाजता आरोपीला दादर स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने मला लांब केस आवडत नसल्याने मी हा प्रकार केल्याची कबुली दिली. मानसिक संतुलन बिघल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्याची खात्री होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये एका ४० वर्षीय महिलेचे केस कापण्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणातही आरोपीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.
----
आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दादर स्थानकावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
- हमराज कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिस ठाणे
----
आरोपीला अटक झाल्यामुळे दिलासा वाटतो; पण अशा घटनांना कायमस्वरूपी आळा बसण्याची गरज आहे. महिला प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण तयार व्हायला हवे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.