

मनोर, ता. ९ (बातमीदार) : राज्यात बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पालघर जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चलाओढ सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आव्हान देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार आयोजित करण्यात आला आहे. लोक दरबाराच्या प्रसिद्धीसाठी जिल्हाभरात लावलेल्या बॅनरवर महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांना स्थान नव्हते. भाजप आणि शिवसेनेत जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक साखळीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने तयारी केली जात असल्याचे बोलले जात आहे.
पालघर जिल्ह्यात भाजपचे तीन, तर शिवसेनेचे दोन आमदार आहेत. शिवसेनेचे दोन्ही आमदार निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिंदे गटात प्रवेश करून निवडून आले आहेत. जिल्ह्यात विरोधी पक्षाचा एकच आमदार असताना जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्यामुळे विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
सरकार स्थापन होऊन पालकमंत्रिपदी नेमणूक झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात गणेश नाईक यांचे दोन जनता दरबार पार पडले. बुधवारी (ता. ९) शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ संपण्याच्या टप्प्यावर पालघरमध्ये जनता दरबारचे आयोजन केले होते. नवीन सरकारमध्ये पालघरच्या पालकमंत्रिपदी गणेश नाईक यांची नेमणूक करण्यात आली. राज्यात सत्तास्थानी असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत सर्व आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी सुप्त संघर्ष सुरू आहे. स्थानिक स्तरावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसून येते.
नागरिकांच्या शेकडो तक्रारी
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या २० फेब्रुवारीच्या पहिल्या जनता दरबारात उपस्थित ८४२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर दुसऱ्या जनता दरबारात ९३३ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. २८ मार्च रोजी झालेल्या जनता दरबारात मार्गदर्शन करताना ६२२ तक्रारी सुटल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला होता.
बॅनरवरून फोटो गायब
शिवसेनेचा लोक दरबारच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे फोटो लावण्यात आले आहेत. महायुतीमधील पक्षांच्या नेत्यांना बॅनरवर स्थान देण्यात आलेले नाही. पालकमंत्री गणेश नाईक यांनी कोणत्याही मंत्र्यांनी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.