पंजाब मेल @ ११४, डेक्कन क्वी@ ९६

पंजाब मेल @ ११४, डेक्कन क्वी@ ९६
Published on

पंजाब मेल @११४, डेक्कन क्वीन @९६
भारतीय रेल्‍वेच्या इतिहासात महत्त्वाचा अध्याय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : भारतीय रेल्वेच्या शतकी वारशाला साजेसा ठरलेला एक अनमोल ठेवा म्हणजे पंजाब मेल आणि डेक्कन क्वीन या दोन प्रतिष्ठित रेल्वेगाड्या. प्रवाशांच्या सेवेत अखंडपणे कार्यरत असलेल्या या दोन्ही गाड्या यंदा अनुक्रमे ११४व्या आणि ९६व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
प्रवास, तांत्रिक प्रगती, सामाजिक बदल आणि सांस्कृतिक जडणघडण यांचा साक्षीदार ठरलेला या गाड्यांचा प्रवास म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.
पंजाब मेल ही ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने (जीआयपीआर) सुरू केलेली सर्वात जुन्या मेल ट्रेनपैकी एक असून, ती १ जून १९१२ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पियर मॉल स्थानकावरून पेशावरकडे रवाना झाली होती. सुरुवातीला ४७ तासांत दोन हजार ४९६ किमी अंतर पार करणाऱ्या या मेलने इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरसारख्या महत्त्वाच्या शहरांमधून धाव घेतली होती. नंतर ही सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस)वरून सुरू झाली आणि दिल्लीपर्यंतचा एक हजार ५४१ किमीचा प्रवास तिने अवघ्या २९ तासांत पूर्ण करायला सुरुवात केली.
१९४५मध्ये वातानुकूलित कोच आणि नंतरच्या काळात डिझेल व इलेक्ट्रिक ट्रॅक्शन तसेच एलएचबी कोचचा समावेश करीत या गाडीने प्रगतीची अनेक पावले ओलांडली. आज ही ट्रेन मुंबई ते फिरोजपूर कॅन्टोन्मेंटदरम्यान एक हजार ९२८ किमीचे अंतर ३३ तास ३५ मिनिटांत पूर्ण करते आणि ५२ स्थानकांमधून ती जाते. तिच्या डब्यांची संरचना व क्षमतेतही मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून, ती आजही भरगच्च गर्दीसह धावते.
दुसरीकडे, डेक्कन क्वीन म्हणजेच डेक्कनची राणी. ही १ जून १९३० पासून मुंबई-पुणे मार्गावर सुरू झालेली पहिली डिलक्स ट्रेन आहे. सुरुवातीस केवळ सात डब्यांसह दोन रॅक असून, एका रॅकला चांदीचा रंग व लाल मोल्डिंग आणि दुसऱ्याला रॉयल ब्लू रंग दिला होता. तिचे कोच इंग्लंडमधून बनवण्यात आलेल्या अंडरफ्रेम्सवर माटुंगा वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आले होते. १९६६मध्ये पेरांबूर कोच फॅक्टरीने बनवलेले नवीन स्टील कोच, १९९५ मध्ये एअर ब्रेक सिस्टीम आणि २०२१ पासून व्हिस्टाडोम कोच यामुळे ही ट्रेन अजूनच आकर्षक ठरली आहे.

आधुनिक सुविधा
२०२२ मध्ये ‘प्रोजेक्ट उत्कृष्ट’अंतर्गत एलएचबी कोच लावण्यात आले आणि सध्या ती १६ कोचच्या सुधारित संरचनेसह धावते. विशेष म्हणजे डेक्कन क्वीन ही भारतातील एकमेव डायनिंग कार असलेली नियमित प्रवासी गाडी असून, यात मायक्रोवेव्ह, टोस्टर, डीप फ्रीजरसारख्या आधुनिक सुविधा आहेत. या दोन्ही गाड्या वेळेचे काटेकोर पालन, प्रवाशांप्रति असलेली सेवा भावना आणि सातत्याने होत गेलेले तांत्रिक बदल यामुळे आजही लाखो प्रवाशांच्या विश्वासाचे पर्याय ठरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com