‘एक ग्रामपंचायत – एक बँक सखी’ उपक्रमाला जिल्ह्यात गती

‘एक ग्रामपंचायत – एक बँक सखी’ उपक्रमाला जिल्ह्यात गती

Published on

‘एक ग्रामपंचायत-एक बँक सखी’ उपक्रमाला जिल्ह्यात गती
बँक ऑफ इंडिया आरसेटी रायगडतर्फे बँकिंग प्रशिक्षण
अलिबाग, ता. १५ वार्ताहर ः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीने ‘एक ग्रामपंचायत-एक बँक सखी’ हा उपक्रम रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जात असून, बँक ऑफ इंडिया आरसेटी रायगड यांच्या माध्यमातून ३१ महिलांना सहादिवसीय बँकिंग प्रशिक्षण देण्यात आले. अलिबाग येथे पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामीण महिलांना बँकिंग व्यवस्थेशी थेट जोडण्यास मोठी मदत होणार आहे.
या प्रशिक्षणांतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या नामांकित संस्थेमार्फत प्रशिक्षणार्थींची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. विशेष बाब म्हणजे या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व ३१ प्रशिक्षणार्थी महिला यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्या असून, त्यांच्या कार्यक्षमतेचे हे महत्त्वपूर्ण प्रमाण ठरले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत प्राप्त यादीनुसार स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थानामार्फत हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत देण्यात येते. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ३१ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, भविष्यात ही संख्या वाढविण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रशिक्षणादरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगडच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, शिरीष पाटील आणि सुजाता पाटील यांची उपस्थिती लाभली. प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी बँक सखी या वंचित घटक व बँक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, बँक सखीची कार्यशैली, जबाबदाऱ्या आणि मिळालेल्या ज्ञानाचा लोकोपयोगी वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी आरसेटीचे संचालक सुमीतकुमार धानोरकर यांनी संभाव्य अडचणी, प्रत्यक्ष कामातील अनुभव आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. येत्या काळात अशाच प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महिलांना या उपक्रमाचा लाभ देण्याचे नियोजन असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com