तलासरी येथे क्रीडा सप्ताह य्त्साहात
परुळेकर महाविद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात
पालघर, ता. १७ (बातमीदार) : तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर वरिष्ठ महाविद्यालयात १० ते १६ डिसेंबर या कालावधीत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या सप्ताहात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, धावणे, गोळाफेक, बुद्धिबळ आणि कॅरम अशा विविध मैदानी व बैठ्या खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी प्रगती मंडळाचे सचिव कॉम्रेड रूपेश राणे, संचालक कॉम्रेड संदीप वावरे आणि प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सप्ताहाच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

