शितपेयांचा वाढता खप

शितपेयांचा वाढता खप

Published on

शीतपेयांचा वाढता खप
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणामाची भीती

कासा, ता. २९ (बातमीदार) : शहरी भागात जरा उन्हाची झळ बसली की, हमखास शीतपेयांचा सर्रास वापर केला जातो. येथील अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा तो भागच झाला आहे, पण आता असंच काहीसं वातावरण ग्रामीण भागातही पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना होणारे बहुतांश आजार आता ग्रामीण भागातही डोकावू लागल्याचे चित्र आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा आणि विक्रमगड या तालुक्यांतील ग्रामीण भागात शीतपेयांच्या विक्रीत झालेली वाढ पाहता, येथील नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या चिंता सामाजिक कार्यकर्त्यांसह आरोग्यतज्ज्ञही व्यक्त करत आहेत. पालघरमधील बहुतेक पट्टा हा आदिवासीबहुल असून, त्यांच्यात शीतपेयाचे वाढते प्रमाण पाहता ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पूर्वीच्या काळी या पट्ट्यात लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असले की, लिंबूसरबत, ताक, चहा किंवा एखादा स्थानिक प्रसिद्ध घरगुती पेय दिले जात होते, पण आता धावपळीच्या या जीवनात या सर्व पदार्थांना मागे सारत त्यांची जागा बाटलीबंद शीतपेयाने घेतली आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, शीतपेयामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यांच्यात कृत्रिम रंगद्रव्ये व इतर घटकांचाही वापर केला जातो. ज्यामुळे दीर्घकाळ शीतपेयांचे सेवन केल्यास लठ्ठपणा, मधुमेय, पचनसंस्थेचे विकार, हृदयविकार यांचा धोका वाढू शकतो. आदिवासी भागातील लहान मुलांसह तरुणांमध्ये शीतपेयाचे वाढते आकर्षण चिंतेचा विषय ठरत आहे. तसेच आदिवासी भागातील शिक्षणाचा अभाव पाहता, येथे मुदतबाह्य झालेल्या शीतपेयांची मोठी विक्री होत असल्याचेही निष्पण झाल्याची माहिती समाजसेवक देतात. याबाबत पालघरमधील अन्न प्रशासन विभाग अधिकारी एस. साळुंखे म्हणाले की, अन्न प्रशासन विभागामार्फत शीतपेय विक्रेत्यांकडून नियमित नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. आम्हाला मुदतबाह्य शीतपेयाची विक्री होत आहे, अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल.

-----------------------
चौकट -
करचुकवेगिरीचे वाढते प्रमाण
फक्त मुदतबाह्य झालेल्या बाटल्यांची विक्रीच नव्हे, तर करचुकवेगिरी करून आणलेल्या मालाची विक्रीही येथे होत असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी अधिक तीव्र करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच गेल्या काही वर्षांत गावागावांत अनेक होलसेल विक्रेते तयार झाले असून, येथे दररोज मोठ्या वाहनांमधून शीतपेयांच्या मोठमोठ्या वाहतूक पेट्यांची आवक होत आहे. राज्य महामार्गालगत असलेल्या दुकानांमुळे या वाहतुकीत वाढ होऊन अपघाताचा धोडा वाढत असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.

--------------------
कोट
डहाणू व तलासरीच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर शितपेयांची विक्री होते. अनेक अशिक्षित नागरिक नकळत मुदतबाह्य बाटल्या खरेदी करतात. कर न भरता आणलेला मालही विकला जातो. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी.
- विपुल राऊत, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, डहाणू

कोट
थंडपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. कृत्रिम घटकांमुळे यकृतविकार, अ‍ॅलर्जी, मधुमेह व हृदयविकारांचा धोका वाढू शकतो. कॅलरी वाढल्याने लठ्ठपणाही वाढतो. शक्यतो अशा पेयांपासून दूर राहून ताज्या फळांचे रस, उसाचा रस, नारळपाणी, लिंबूपाणी किंवा स्वच्छ पाणी पिणे अधिक हितावह आहे.
- डॉ. सचिन सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com