उपनगरीय रुग्णालयांत लवकरच आयसीयू सेवा सुरू

उपनगरीय रुग्णालयांत लवकरच आयसीयू सेवा सुरू

Published on

उपनगरीय रुग्णालयांत लवकरच आयसीयू सेवा
१५३ खाटांसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये लवकरच आयसीयू सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. आयसीयू चालवण्यासाठी अनुभवी व कुशल डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत ही आयसीयू सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या १२ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आयसीयू चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. बराच काळ अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर आता या प्रक्रियेला गती मिळाली आहे. एकूण १५३ खाटांसाठी ही निविदा काढण्यात आली असून, याअंतर्गत ठेकेदाराला केवळ आयसीयूसाठी डॉक्टरांची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. सर्व काही नियोजनानुसार झाले तर लवकरच आयसीयू खाटा उपलब्ध न होण्याची समस्या काहीशी सुटेल आणि रुग्णांना दिलासा मिळेल, असेही सांगितले आहे.
निविदेतील अटींनुसार, प्रत्येक आयसीयूसाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी एक एमबीबीएस आणि एक पदव्युत्तर (पीजी) डॉक्टर, एक ऑन-कॉल पीजी कन्सल्टंट तसेच सुट्टीच्या दिवसांसाठी अतिरिक्त एक एमबीबीएस आणि एक पीजी डॉक्टरची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. म्हणजेच प्रत्येक आयसीयूसाठी दरमहा एकूण नऊ डॉक्टरांची सेवा आवश्यक आहे. अनेक रुग्णालयांसाठी कंत्राटदारांनी दरमहा १.३२ लाख ते तीन लाखांदरम्यान दर दिला आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात ३० बेडसाठी असून फक्त प्रति बेड २६.५० रुपये दर आहे. निविदेत डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या दरावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, आयसीयूमध्ये चांगले उपचार कसे दिले जातील, असेही विचारले जात आहे.
एका खाटेमागे सुमारे २,६०० ते २,८५० रुपयांच्या दरम्यान दर निश्चित केला जात आहे. आता ही फाईल प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांकडून अतिरिक्त पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. नगरसेवकांची निवड पूर्ण झाल्याने या प्रस्तावाला मंजुरीसाठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवले जाऊ शकते. तेथून मंजुरी मिळताच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येईल.
या निर्णयामुळे रुग्णांना घराजवळच अनुभवी डॉक्टरांकडून उपचार मिळणार आहेत. मात्र मागील वेळी खासगी हातात आयसीयू देण्याचा निर्णय पालिकेसाठी डोकेदुखी आणि चुकीचा ठरला होता आणि रुग्णांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की मागील अनुभवातून धडा घेत या वेळी निविदा प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवण्यात आली आहे. डॉक्टर गैरहजर राहिल्यास ठेकेदारावर मोठ्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

तीन ठेकेदार इच्छुक
पालिकेशी संबंधित एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की आयसीयू चालवण्यासाठी एकूण तीन ठेकेदारांनी रस दाखवला आहे. त्यानंतर ‘सी पॅकेट’ उघडण्यात आले असून, दरही निश्चित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com