उल्हासनगर महापालिकेतील सत्तासंघर्ष संपला; महापौर शिवसेनेकडे, उपमहापौर भाजपकडे; महायुतीची सत्ता निश्चित
उल्हासनगरमध्ये महायुतीची सत्ता
महापौर शिवसेनेकडे; उपमहापौर भाजपकडे
उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) ः शहराच्या राजकारणात निर्णायक वळण लागले आहे. निवडणुकीत परस्परविरोधात लढलेले शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप अखेर सत्तेसाठी एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून महापालिकेवर आपली पकड मजबूत करणार आहेत. महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे जाणार असल्याने उल्हासनगरच्या राजकीय इतिहासात महायुतीचे नवे पर्व सुरू झाले आहे.
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारी शिवसेनेच्या टीओके कोटामधून अश्विनी कमलेश निकम यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला, तर भाजपकडून अमर लुंड यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. या दोघांचेच अर्ज आल्याने आता महापालिकेतील सत्ता महायुतीकडेच राहणार, हे निश्चित झाले आहे.
राजेंद्र चौधरी यांची अनुपस्थिती
अर्ज भरताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. महापालिका परिसरात या वेळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, शिवसेनेकडून वरिष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच डिंपल ठाकूर यांच्या नावांची महापौरपदासाठी चर्चा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर अचानक अश्विनी कमलेश निकम यांच्या नावावर सहमती झाली. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या वेळी राजेंद्र चौधरी यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
नाराजीची कुजबुज
राजकीय जाणकारांच्या मते, अश्विनी कमलेश निकम या प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका असून, थेट महापौरपदाची जबाबदारी मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजीची कुजबुजही ऐकू येत आहे. तसेच त्यांना कलानी कुटुंबाच्या निकटवर्तीय मानले जाते. याच राजकीय समीकरणामुळे संपूर्ण सत्तागणित महायुतीच्या बाजूने झुकल्याचे बोलले जात आहे.
विरोधी पक्ष उरणार नाही
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने येत्या ३ फेब्रुवारीला होणारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे. सत्तास्थापनेनंतर महापालिकेत प्रभावी विरोधी पक्ष उरणार नसल्याचा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. त्यामुळे पुढील काळात उल्हासनगर महापालिकेचे प्रशासन, निर्णय प्रक्रिया आणि राजकीय दिशा कशी राहणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

