केडीएमसी महापौर–उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट
कल्याण-डोंबवलीच्या महापाैरपदी ॲड. हर्षाली थविल
उपमहापौरपदी राहुल दामले, दोघांचे एकमेव अर्ज; शिवसेना, भाजप, मनसे एकत्र
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका ॲड. हर्षाली थविल यांनी महापौर पदासाठी तर भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल केला. शिवसेना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र येत महायुतीमधील नगरसेवकांचे अर्ज दाखल केल्याने महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका ॲड. हर्षाली थविल यांनी महापौर पदासाठी तर भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. हे अर्ज शिवसेना, भाजप तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. या वेळी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसे नेते राजू पाटील, भाजपचे नंदू म्हात्रे, नाना सूर्यवंशी, गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या महत्त्वाच्या पदांवरील निवडणुकीचा निकाल निश्चित झाला आहे. त्यामुळे येत्या ३ फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार आहे.
मनसेमुळे महायुतीची ताकद वाढली
नव्या महापौर व उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच त्यांनी मनसेचे आभार मानले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच नेते राजू पाटील यांचे मी धन्यवाद मानतो. त्यांनी महायुतीला येथे पाठिंबा दिला. शिवसेना व भाजपचे मोठी ताकद येथे होतीच. त्यात आता मनसेचेदेखील भर पडली आहे. मनसेची साथ मिळाल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. विकासकामांना आता गती मिळेल. येत्या ३ तारखेला महापौर व उपमहापौर हे बिनविरोध निवडून येतील, अशी आशा व्यक्त करतो, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
-------
या लाडक्या बहिणीवर पक्षाने, पक्षातील वरिष्ठांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. ग्रामीण भागातून आलेल्या नगरसेवकाला संधी मिळाली आहे. आम्ही नक्कीच चांगले काम करून दाखवू.
- ॲड. हर्षाली थविल, महापौरपदाच्या उमेदवार
-------------------
पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे. पक्षातील वरिष्ठांचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. येत्या काळामध्ये रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आमचे पहिले प्राधान्य असेल.
- राहुल दामले, उपमहापौरपदाचे उमेदवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

