नळजोडणी बदलण्यास नागरिकांचा विरोध
नळजोडणी बदलण्यास नागरिकांचा विरोध
अंबोजवाडीत पालिकेच्या नोटिसा
मालाड, ता. ३१ (बातमीदार) ः न्यू भाबरेकर नगर, बुद्ध विहारसमोर, अंबोजवाडी-मालवणी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या पाण्याच्या नळजोडण्या नवीन जलवाहिनीवर सात दिवसांच्या आत ट्रान्स्फर करून घ्याव्यात, असे आदेश महानगरपालिकेच्या जलखात्याच्या सहाय्यक अभियंत्यांनी नोटिशीद्वारे दिले आहेत. मात्र, या नोटिशीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, काम करताना पूर्वीप्रमाणे रस्त्याच्या कडेला जलवाहिनी टाकून त्यावरूनच नळजोडणी कायम ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र, पालिकेने नळजोडणी ट्रान्स्फर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढली आहे.
या नोटिशीच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी कंत्राटदाराकडून सुरू असलेले खोदकाम बंद पाडले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, आधीच परिसरात पाणीपुरवठा अपुरा आहे. अशा परिस्थितीत नळजोडणी नवीन जलवाहिनीवर ट्रान्स्फर केल्यास पाण्याचा दाब कमी होण्याची आणि पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
तसेच नव्याने नळजोडणी करण्याचा खर्च नागरिकांवरच टाकला जाणार असल्याने त्यालाही तीव्र विरोध करण्यात येत आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकून त्यावरूनच पूर्ववत नळजोडणी द्यावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
पालिकेच्या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त करत, स्थानिक रहिवाशांनी सोमवारी पी/उत्तर विभागातील जलखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
रहिवासी उर्मिला जैस्वाल म्हणाल्या, आमची जलजोडणी ट्रान्स्फर केल्यास मुबलक पाणी मिळण्याची शाश्वती नाही. शिवाय पुन्हा नळजोडणीचा खर्च करावा लागेल. मंगला गंभीरे म्हणाल्या, पूर्वी जलजोडणी केल्यानंतर खूप त्रास सहन करावा लागला होता. आता पाणी नीट सुरू असताना ती पुन्हा का हटवून ट्रान्स्फर करावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

