

अलिबाग समुद्रकिनारी मत्स्यालय उभारणीला वेग
पर्यटनाला मिळणार चालना ; नगराध्यक्षांकडून पाहणी
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) ः अलिबाग नगर परिषदेच्या विशेष अनुदान योजनेतंर्गत समुद्रकिनारी सुरू असलेल्या मत्सालयाच्या कामाला पुन्हा गती मिळाली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम काही काळापासून बंद होते. या अडचणी दूर करण्यात आल्या असून कामाला वेग मिळाला आहे. नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार व संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.
अलिबाग समुद्रकिनारी मत्स्यालयाची उभारणी केली जात आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले होते. सहा महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या मत्सालयाचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे काही काळापासून बंद होते. आता या अडचणी दूर करण्यात आल्या असून काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहेत.
मत्स्यालयाच्या कामाची पाहणी नुकतीच नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी केली असून सविस्तर माहिती घेतली. यावेळी नगराध्यक्षांनी कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. लवकरात लवकर या सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी काम ठरलेल्या वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारास देण्यात आल्या आहेत. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते प्रशांत नाईक, पाणी सभापती तथा नगरसेवक अनिल चोपडा यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अलिबाग शहराच्या सौंदर्यात भर घालणारे व स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारे हे मत्सालय लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
अशी आहे मत्स्यालयाची रचना :
मत्स्यालयात विविध प्रकारचे सागरी मासे ठेवले जाणार आहेत. ४० फूट लांबीच्या मत्स्यालय टनेलचा यात समावेश असणार आहे.
याशिवाय या मत्स्यालयात पर्यटकांना पाण्यात उतरून सागरी जीवसृष्टीचा अनुभव घेता येणार आहे. फूड कोर्ट आणि कॅफेटेरीयाचाही या समावेश असणार आहे.
दुबईच्या धर्तीवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार असून देशातील अशा पध्दतीचे हे पहिले मत्स्यालय असणार आहे. या प्रकल्पामुळे अलिबागच्या पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.