अवकाळी व ढगाळ वातावरणात आंबा पिकाला धोका
अवकाळी व ढगाळ वातावरणात आंबा पिकाला धोका
कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; बागायतदार चिंतेत
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) ः बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील आंबा पिकाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता. २७) पहाटे अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे मोहर प्रक्रिया थांबण्यासह विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, यामुळे आंबा उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा या फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकरी आणि विशेषतः तरुण वर्ग फळपिकांकडे वळताना दिसत आहे. परिणामी, जिल्ह्यातील आंबा लागवडीखालील क्षेत्र सातत्याने वाढत असून, सध्या सुमारे १७ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड केली जात आहे. यापैकी १४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र उत्पादनक्षम असून, जिल्ह्यात ५६ हजारांहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत.
साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाने मोहोर प्रक्रिया उशिरा झाली होती. तरीही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली फवारण्या करून पिकांची योग्य देखभाल केली. अनुकूल वातावरणामुळे यावर्षी आंब्याला चांगला बहर आला होता. मात्र, अचानक झालेल्या पावसाने आणि त्यानंतर निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटेपासून पडलेल्या रिमझिम पावसानंतर दुपारपर्यंत अनेक भागांत ढगाळ वातावरण राहिले. या बदलत्या हवामानामुळे आंबा पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

