

रायगड जिल्ह्यात ‘लखपती दीदी’चा प्रभाव
स्वयंसहाय्यता गटांमधून १.३८ लाखाहून अधिक महिला बनल्या स्वावलंबी
श्रीवर्धन, ता. ३१ (बातमीदार) : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाअंतर्गत (उमेद) आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमांचा रायगड जिल्ह्याला मोठा फायदा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल एक लाख ३८ हजार ४०९ महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत.
जिल्ह्यातील १५ तालुके, ८२१ ग्रामपंचायती आणि १,९६३ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यामुळे महिलांनी घराच्या उंबरठ्याबाहेर पडत स्वतःचा उद्योग उभा केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पनवेल तालुक्यात (१८,३६९), त्यापाठोपाठ अलिबागमध्ये (१५,५९४), पेणमध्ये (१४,८३५), कर्जतमध्ये (१४,८८२) महिलांनी लाभ घेतला आहे. कोकण किनारपट्टीतील श्रीवर्धन तालुक्यात ३,६८८ महिला, तर माणगाव (८,०६४), रोहा (९,१४४), महाड (९,९७३) या तालुक्यांमध्येही महिलांनी व्यवसाय उभारणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून दुग्धोत्पादन, शेतीपूरक व्यवसाय, काजू-आंबा प्रक्रिया उद्योग, हस्तकला, मसाले तयार करणे, फुलशेती, कुक्कुटपालन तसेच सेवा क्षेत्रातील लघुउद्योग सुरू केले आहेत. अनेक महिलांनी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेत ऑनलाइन विक्रीस सुरुवात केली आहे. ‘डिजिटल आजीविका रजिस्टर’मुळे उत्पन्न आणि खर्चाची नोंद ठेवणे सुलभ झाले असून, बँकिंग व्यवहारातही पारदर्शकता वाढली आहे.
श्रीवर्धनमध्ये सकारात्मक बदल
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांनी घरगुती पदार्थ, सुकामेवा प्रक्रिया, मच्छी प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन किनारपट्टीवर पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महिलांनी होमस्टे, खाणावळी आणि स्थानिक उत्पादनांची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
महिलांची जिद्द
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालविकास विभाग आणि बँकांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण, कर्जपुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध झाली. या पाठबळामुळे अनेक महिला आत्मविश्वासाने पुढे आल्या आहेत. ‘लखपती दीदी’ उपक्रमामुळे महिलांमध्ये नेतृत्वगुण, आर्थिक साक्षरता आणि सामाजिक सहभाग वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.