नियमांचे उल्लंघन महागात

नियमांचे उल्लंघन महागात

Published on

पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : वायू आणि ध्वनी प्रदूषण, तसेच पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांविरोधात पनवेल महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. शहरातील ३४ बांधकाम प्रकल्पांचे काम तत्काळ स्थगित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेने यापूर्वी शहरातील १६९ बांधकाम प्रकल्पांना इशारावजा नोटिसा बजावून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नोटीस देऊनही काही बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेच्या विशेष पथकाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नियमांची अंमलबजावणी तपासली. या स्थळपाहणीदरम्यान अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, पाणी फवारणी न करणे, वाहने स्वच्छ न ठेवणे, तसेच ब्लास्टिंग करताना मानक कार्यपद्धतींचे उल्लंघन केल्याचे गंभीर प्रकार समोर आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन संबंधित प्रकल्पांवर तातडीने कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान संबंधित विकसकांना तत्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आला आहे. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा व पर्यावरण संरक्षणासाठी पनवेल महापालिका कटिबद्ध असून, यापुढेही शहरातील बांधकाम प्रकल्पांवर अशाच प्रकारच्या तपासण्या आणि कठोर कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या नियमांचे उल्लंघन
महापालिकेच्या स्थळपाहणी अहवालानुसार, अनेक बांधकामस्थळांवर २५ फूट उंचीचे संरक्षणात्मक पत्रे न लावणे, ओले कापड अथवा ताडपत्रीने बांधकाम क्षेत्र बंदिस्त न करणे, वॉटर स्प्रिंकलर किंवा स्मॉग गनचा वापर न करणे, सेन्सर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर व सीसीटीव्ही कॅमेरे न बसवणे, तसेच साहित्य बंदिस्त न ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या.

नागरिकांचे आरोग्य, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संरक्षणाला पनवेल महापालिकेचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला तडजोडीची भूमिका घेतली जाणार नाही. सर्व विकसकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, उल्लंघन आढळल्यास कामबंदी व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा तपासण्या पुढेही नियमितपणे सुरू राहणार आहेत.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

विभागनिहाय महापालिकेची कारवाई
विभाग बांधकाम प्रकल्प
कळंबोली १०
कामोठे ९
नवीन पनवेल/पनवेल १५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com