

उपचारानंतर आत्मविश्वासाने कामावर परतण्याचा नवा मार्ग
केईएममध्ये कामगार, चालक व तंत्रज्ञांसाठी मोफत मूल्यांकन आणि प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : रस्ता अपघात, कारखान्यातील दुखापत किंवा स्ट्रोकनंतर रुग्णांचे उपचार शस्त्रक्रिया व औषधांपर्यंत मर्यादित राहत होते. मात्र उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्ण पुन्हा आपल्या मूळ कामावर आत्मविश्वासाने परतू शकतील का, हे खरे आव्हान असते. याच गरजेला उत्तर देण्यासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात व्यावसायिक उपचार, कार्यतत्परता व पुनर्वसन विभाग (वर्क रेडीनेस अँड रिहॅबिलिटेशन युनिट) सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले समर्पित युनिट ठरले आहे.
या युनिटमध्ये उपचारांच्या पलीकडे जाऊन रुग्णाच्या प्रत्यक्ष काम करण्याच्या क्षमतेवर भर दिला जाणार आहे. ऑक्युपेशनल थेरपी विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. सुशांत सारंग यांनी सांगितले, की रुग्णाच्या नोकरीतील शारीरिक, मानसिक आणि सामाजिक मागण्यांचे सखोल मूल्यांकन केले जाईल आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रुग्ण कितपत सक्षम आहे, हे तपासले जाईल.
या प्रक्रियेत चार टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कामाच्या मागणीचे विश्लेषण केले जाते, ज्यामध्ये वजन उचलणे, उभे राहणे किंवा बसण्याचा कालावधी आणि हाताची पकड यांचा समावेश असतो. दुसऱ्या टप्प्यात कार्यात्मक क्षमता मूल्यांकनाद्वारे रुग्णाची ताकद, संतुलन आणि सहनशक्ती तपासली जाते. तिसऱ्या टप्प्यात कामासाठी शारीरिक-मानसिक सुसज्जता सुरू होते. यामध्ये स्नायूंवर लक्ष केंद्रित करून सहनशक्ती वाढवली जाते. शेवटच्या टप्प्यात कामासाठी क्षमतावृद्धी प्रशिक्षणाद्वारे रुग्णाला प्रत्यक्ष कामासारखे प्रशिक्षण दिले जाते आणि हळूहळू भार व वेळ वाढवला जातो.
सहयोगी प्राध्यापक डॉ. हेमंत नाडगावकर यांनी सांगितले, की या युनिटचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष कामाचे अनुकरण. येथे शिलाई मशीन ऑपरेटर, ड्रायव्हर्स, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, बस कंडक्टर, दुकानदार, संगणक ऑपरेटर व कामगारांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि वाहनचालकांना अनुकरण यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. वजन उचलण्याची क्षमता मोजण्यासाठी आधुनिक उपकरणेही उपलब्ध आहेत. खासगी ठिकाणी एका सत्रासाठी किमान १,००० रुपये खर्च येतो; मात्र केईएममध्ये ही थेरपी मोफत दिली जाणार आहे.
पाठीच्या कण्यातील दुखापत, फ्रॅक्चर, स्ट्रोक, अंगच्छेदन, क्रश दुखापती व प्लॅस्टिक सर्जरी झालेल्या रुग्णांना याचा थेट लाभ होईल. तसेच ऑटिझम किंवा बौद्धिक अपंगत्व असलेल्या तरुणांचे नोकरीपूर्व मूल्यांकनही येथे केले जाईल आणि गरज असल्यास फिटनेस प्रमाणपत्र दिले जाईल.
१९५०मध्ये केईएममध्ये आशियातील पहिले ऑक्युपेशनल थेरपी महाविद्यालय सुरू झाले होते. २०२५मध्ये हा ७५ वर्षांचा गौरवशाली वारसा पूर्ण करीत असताना हे नवे युनिट त्याचा आधुनिक विस्तार ठरत आहे. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बेचे पाठबळ आणि अंबाश्री फाउंडेशन किलाचंद देवचंद चॅरिटी ट्रस्टच्या देणगीतून हे केंद्र साकारले आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम्ही रुग्ण मूल्यांकन आणि प्रशिक्षणासाठी वास्तविक कामाच्या वातावरणाचे अनुकरण करणारी उपकरणे बसवली आहेत. त्यामुळे कामगार, ड्रायव्हर्स आणि इलेक्ट्रिशियन उपचारानंतर सुरक्षितपणे त्यांच्या कामावर परतू शकतील. रुग्णांना याचा मोठा फायदा होईल आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- डॉ. संगीता रावत,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.