नियम फक्त ‘कॉमन मॅन’साठी

नियम फक्त ‘कॉमन मॅन’साठी
Published on

पालिकेच्या मुख्य आवारातच वाहनांचा गराडा
बदलापुरात लोकप्रतिनिधीचा नियमांना हरताळ

मोहिनी जाधव ः सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २४ : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची सात मजली भव्य इमारत १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिमाखात सुरू झाली. भविष्यातील महापालिकेचा विचार करून या इमारतीत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशस्त ‘अंडरग्राउंड’ (तळघर) पार्किंग उभारण्यात आले; मात्र दुर्दैवाने या आधुनिक सुविधेचा वापर करण्याऐवजी लोकप्रतिनिधी आपल्या गाड्या पालिकेच्या मोकळ्या आवारात आणि मुख्य प्रवेशद्वारासमोरच लावत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नियमांची पायमल्ली तर होतच आहे; पण सामान्य नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन झाली आणि प्रशासकीय कामकाजाला वेग आला; मात्र लोकप्रतिनिधींनी शिस्त पाळण्याकडे पाठ फिरवली आहे. पालिकेत येणारे लोकप्रतिनिधी तळघरातील पार्किंगचा वापर टाळून थेट इमारतीच्या समोर गाड्या उभ्या करतात. सामान्य नागरिकांनी आवारात गाडी लावल्यास सुरक्षा रक्षक त्यांना तत्काळ हटकतात आणि तळघरात गाडी लावण्यास भाग पाडतात; मात्र लोकप्रतिनिधींच्या गाड्यांसमोर प्रशासन हतबल दिसत आहे.

दिव्यांगांना अडथळ्यांची शर्यत
सर्वसाधारण सभा किंवा विशेष बैठकींच्या वेळी मुख्य प्रवेशद्वारापासून ते इमारतीच्या दारापर्यंत वाहनांची इतकी अनियमित गर्दी असते, की तिथून चालणेही कठीण होते. दारासमोरच गाड्या पार्क असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना इमारतीत प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. जर एखाद्या नागरिकाने नियमानुसार पार्किंगमध्ये गाडी लावली असेल, तर या अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या गाड्यांमुळे त्याला आपली गाडी बाहेर काढताना तासनतास अडकून पडावे लागते.

प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा
स्वतः नियमांचे पालन न करणारे लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांकडून शिस्तीची अपेक्षा कशी ठेवणार, असा संतप्त सवाल बदलापूरकर विचारत आहेत. ही भव्य पार्किंग सुविधा नेमकी कोणासाठी उभारली आहे, असा प्रश्न उपस्थित करत, प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या गाड्यांवरही कारवाई करावी आणि पार्किंगची शिस्त लावावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com