

पूल विस्ताराच्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम
अधिकाऱ्यांसोबत पाहणी व बैठक
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : अंधेरी-घाटकोपर लिंक रोड आणि जंगलेश्वर मंदिर रोड (खैरानी रोड) यांना जोडणाऱ्या पुलाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, अचानक महापालिकेकडून स्थानिक रहिवाशांना घरे व दुकाने खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार सदर पुलाचे विस्तारीकरण प्रस्तावित असून, त्यासाठी संबंधित जागा मोकळी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप नोंदवत ही बाब नगरसेवक किरण लांडगे यांच्याकडे मांडली. त्यानंतर लांडगे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष विजू शिंदे यांच्या सोबत पाहणी करून समिती कार्यालयात एक बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ८) विजयेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिज विभाग, रस्ते व मेंटेनन्स विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता. ९) प्रभाग समिती अध्यक्षांच्या दालनात संबंधित अधिकारी व नागरिक यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांनी स्पष्ट केले की, पुलाच्या विस्तारीकरणास कोणाचाही विरोध नाही. मात्र, ज्या घरांना व दुकानांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, ती जागा प्रत्यक्षात प्रस्तावित विस्तारीकरणाच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे नोटिसांच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच, विस्तारीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मोबदला मिळणार का?, मिळणार असल्यास तो किती? व कोणत्या निकषांवर, याबाबतही स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, जंगलेश्वर मंदिर रोडचे रुंदीकरण काम गेल्या १० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न होता, तेथे केवळ पुलाचा विस्तार केल्यास एम.एम. रोडवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, येत्या सोमवारी (ता. १३) नियोजन अधिकाऱ्यांसोबत पुन्हा प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक किरण लांडगे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.