खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार नवं आकाश

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार नवं आकाश
Published on

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार नवे आकाश
नवी मुंबईत उभारणार पाच क्रीडा संकुले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता नवी मुंबईमध्ये पाच ठिकाणी क्रीडा संकुले उभारण्यात येणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या नवी मुंबईतील शेकडो कीर्तिवंत खेळाडूंना सराव करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
क्रीडा म्हणजे फक्त खेळ नाही, तर शिस्त, संयम आणि टीम वर्क शिकवणारी जीवनशाळा आहे. तसेच नवी मुंबईमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व सरावाकरिता सुसज्ज आधुनिक क्रीडा संकुल उभे केल्यास शहरातील खेळाडू ऑलिंपिक, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चे आणि नवी मुंबईचे नाव उज्ज्वल करतील, अशी शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी दोन वर्षांपूर्वीच दर्जेदार व अत्याधुनिक क्रीडा संकुलांची संकल्पना प्रशासनाकडे मांडली होती. अनेक वर्षे हा प्रकल्प सरकारी फाईलमध्ये तसाच पडून होता. परंतु मंदा म्हात्रे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी येथे प्रत्येकी एक क्रीडा संकुल असा ५० कोटींचा निधी मंजूर केला. यामुळे प्रत्येक खेळाडूला आपल्या परिसरातच आधुनिक सुसज्ज आणि दर्जेदार सरावाची संधी मिळणार आहे. हे फक्त क्रीडा संकुल नाही. हे हजारो स्वप्नांना पंख देणारे व्यासपीठ आहे. बेलापूर मतदारसंघामध्ये दरवर्षी होणारी आमदार चषक क्रिकेट स्पर्धा अनेक प्रतिभावान खेळाडू तयार करते. विकासाबरोबर क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातही नवी मुंबई विकसित झाली पाहिजे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
या उपक्रमामुळे शहरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या क्रीडा संकुलांमध्ये विविध खेळांसाठी आधुनिक मैदाने, प्रशिक्षण केंद्रे आणि आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून नवी मुंबईतील खेळाडूंना ऑलिंपिक गेमसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकण्याची संधी मिळणार आहे.

क्रीडा संकुलांच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबई क्रीडा क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे. युवकांना खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी शेजारच्या शहरातील क्रीडा संकुलांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com