

शिंदेंच्या प्रभावक्षेत्रात फडणवीसांचे हुकमी एक्के
- भाजपकडून विधान परिषद उमेदवार जाहीर
- ठाण्यातून माधवी नाईक, कोकणात प्रमोद जठार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ ः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची घोषणा करताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या यादीवर नजर टाकली असता भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रातच आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्यातून माधवी नाईक तर कोकणातून प्रमोद जठार या दोन शिलेदारांचा पाच जणांच्या उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातून आणखी एक भाजप आमदार विधान परिषदेवर जाणार असून ही संख्या तीनवर पोहोचणार आहे. शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे आव्हान समजले जात आहे.
ठाणे आणि कोकण शिंदेंचे पारंपरिक बालेकिल्ले. या ठिकाणी भाजपने स्वतंत्र ताकद उभी करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अॅड. माधवी नाईक यांना संधी देत भाजपने स्थानिक पातळीवर नवे समीकरण मांडले आहे. महापालिकेतील माजी नगरसेविका, सध्या प्रदेश पातळीवरील जबाबदारी सांभाळणाऱ्या नाईक या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जातात. त्यामुळे ठाण्यातील सत्तासमीकरणात भाजपचा स्वतंत्र ठसा उमटवण्याची ही सुरुवात मानली जाते आहे.
कोकणात प्रमोद जठार यांची निवडही तितकीच बोलकी ठरते. सिंधुदुर्गातील राजकीय घडामोडींमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जठार यांची एंट्री ही राजकीय संदेश मानण्यास हरकत नाही.
दरम्यान, संघटनात्मक पातळीवर दीर्घकाळ काम करणाऱ्यांनाही या वेळी न्याय देण्यात आला आहे. सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांची निवड ही त्याचाच भाग मानली जाते. पडद्यामागे रणनीती आखणारे, संघटन मजबूत करणारे चेहरे पुढे आणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीम बिल्डिंग’वर भर दिल्याचे स्पष्ट होते.
विवेक कोल्हे यांची उमेदवारी ही राजकीय वचनपूर्तीचे उदाहरण ठरली. विधानसभा निवडणुकीत संधी न मिळाल्यानंतर त्यांना विधान परिषदेत पाठवण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्या वचनाची पूर्तता करत त्यांनी आपली राजकीय विश्वासार्हता कायम ठेवली.
ताकद दाखवण्याचा प्रयत्न
या सर्व घडामोडींमधून भाजपने महायुतीत आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. विशेषतः शिंदेंच्या प्रभावक्षेत्रातच आपले उमेदवार देत भाजपने भविष्यातील राजकीय समीकरणांची बीजे पेरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी काळात ही निवडणूक केवळ विधान परिषदेपुरती मर्यादित न राहता महायुतीतील अंतर्गत शक्ती-संतुलनावरही परिणाम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.