

रोडपालीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न थेट सभागृहात
रोडपालीतील फुडलँड चौकात उड्डाणपुलाचे संकेत
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; रोडपाली उड्डाणपुलाला गती
पनवेल ता. २३ (बातमीदार) : रोडपाली येथील फुडलँड कंपनी चौकातील वाहतूक कोंडी आणि वाढते अपघाताचा प्रश्न अखेर राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या पटलावर घुमला आहे. राज्य विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय उपस्थित करत या समस्येला वाचा फोडली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीमध्ये सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे फुडलँड चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला आता नवी गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विधान परिषदेच्या अधिवेशनात मंगळवारी (ता. २३) तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रश्नाद्वारे विक्रांत पाटील यांनी रोडपालीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. फुडलँड कंपनी चौकात दिवसेंदिवस वाढणारी कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. केवळ समस्या मांडून न थांबता या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, नवीन प्रस्ताव तयार केला आहे का, तसेच या कामाला मंजुरीसाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती मागितली. या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी कोंडीची समस्या अंशतः खरी असल्याचे मान्य केले.
प्रकल्प केंद्र सरकारच्या विचाराधीन : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ अंतर्गत निगडी (भक्ती-शक्ती चौक) ते शिळफाटा या मार्गाच्या सहापदरीकरणासह विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावामध्ये पनवेल पालिका हद्दीतील रोडपाली येथील फुडलँड कंपनी चौकातील उड्डाणपुलाचा समावेश केला असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता शासकीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उड्डाणपूल झाल्यास परिसराला मोठा दिलासा!
फुडलँड चौक हा पनवेल परिसरातील सर्वात व्यस्त वाहतूक केंद्रांपैकी एक मानला जातो. मुंबई-पुणे महामार्ग, सायन-पनवेल मार्ग आणि नवी मुंबईतील विविध नोड्सना जोडणारा हा चौक असल्यामुळे येथे वाहनांचा प्रचंड ताण असतो. परिणामी दररोज वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय यांचा सामना नागरिकांना करावा लागतो.
रोडपालीतील फुडलँड चौक हा पनवेल परिसरातील अत्यंत वर्दळीचा आणि वाहतूक कोंडीचा मुख्य बिंदू बनला आहे. यामुळे नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत मी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. शासनाने उड्डाणपुलाचा समावेश प्रकल्पात केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाला केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळून काम लवकर सुरू व्हावे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
- विक्रांत पाटील, आमदार, विधान परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.